मीरारोड येथे रुग्णालय उभारणीसाठी १८० कोटींच्या निधीसाठी आमदार सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 18:38 IST2021-03-07T18:37:46+5:302021-03-07T18:38:28+5:30
मीरारोड मधील रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर रुग्णालय बांधण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात १८० कोटी रुपयांची तरतूद करावी असे साकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे

मीरारोड येथे रुग्णालय उभारणीसाठी १८० कोटींच्या निधीसाठी आमदार सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
मीरारोड - मीरारोड मधील रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर रुग्णालय बांधण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात १८० कोटी रुपयांची तरतूद करावी असे साकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे .
महानगरपालिका हद्दीतील आरक्षण क्र. ३०२ हा भुखंड रूग्णालयासाठी आरक्षित आहे . १३ हजार चौमी क्षेत्राचा हा भुखंड पालिकेने टीडीआर देऊन ताब्यात घ्यावा अशी मागणी जून २०२० पासून आयुक्तां कडे चालवली आहे . सदर रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर अद्ययावत रूग्णालय तसेच डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था व परिचारिका यांच्या प्रक्षिशण केंद्राची उभारणी होऊ शकते असे सरनाईकांचे म्हणणे आहे .
सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मीरा भाईंदरच्या रूग्णालयासाठी १८० कोटी रूपयांची तरतूद करावी अशी विनंती सरनाईक यांनी केली आहे. रूग्णालयाच्या निर्मितीसाठी किमान ३ ते ४ वर्ष लागणार असून ही रक्कम सरकारकडून टप्याटप्याने महानगरपालिकेला द्यावी, जेणेकरून रूग्णालयाची उभारणी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालय उभारण्याच्या मागणीत लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले .
कोरोना'च्या संकट काळात शहरामध्ये रूग्णालयांची संख्या अपुरी पडून अनेक रुग्णांचे हाल झाले. काही खासगी रूग्णालयांनी गलेगठ्ठ बिले आकारली व जनतेची लूट केली. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भाईंदर मधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय तर मीरारोड मधील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय अपुरे पडत आहेत . त्यामुळे नवीन सुसज्ज सरकारी रुग्णालय उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. सरनाईक म्हणाले .