Mira Road: जुन्या निष्ठावंतांना डावलून नवख्यास शहर अध्यक्ष पद दिल्याने मीरा भाईंदर मनसेत नाराजी
By धीरज परब | Updated: January 14, 2024 23:57 IST2024-01-14T23:56:50+5:302024-01-14T23:57:10+5:30
Mira Road MNS News: मीरा भाईंदर मनसेचे शहर अध्यक्ष पद जुने निष्ठावंत असलेले हेमंत सावंत यांच्या कडून काढून ते नव्याने आलेल्या संदीप राणे यांना दिल्याने मनसेत नाराजी पसरली असून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मावळते शहर अध्यक्ष सावंत यांच्या कडे दिले आहेत .

Mira Road: जुन्या निष्ठावंतांना डावलून नवख्यास शहर अध्यक्ष पद दिल्याने मीरा भाईंदर मनसेत नाराजी
मीरारोड - मीरा भाईंदर मनसेचे शहर अध्यक्ष पद जुने निष्ठावंत असलेले हेमंत सावंत यांच्या कडून काढून ते नव्याने आलेल्या संदीप राणे यांना दिल्याने मनसेत नाराजी पसरली असून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मावळते शहर अध्यक्ष सावंत यांच्या कडे दिले आहेत . तर या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मंगळवारी सावंत सह मनसेचे पदाधिकारी , कार्यकर्ते भेटणार आहेत.
मीरा भाईंदर मनसेचे शहर अध्यक्ष असलेले हेमंत सावंत हे राज ठाकरे यांचे विद्यार्थी सेने पासूनचे कट्टर समर्थक व निष्ठांवंत म्हणून ओळ्खले जातात . मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी अविनाश जाधव यांच्या नियुक्ती नंतर ठाकरे यांचे जुने समर्थक निष्ठावंत प्रसाद सुर्वे यांनी मनसे सोडून भाजपात प्रवेश केला होता . त्या नंतर आता ठाकरे यांचे आणखी एक जुने कट्टर समर्थक हेमंत सावंत याना तडकाफडकी जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्याने व विविध पक्षातून भ्रमण करून आलेले संदीप राणे यांना मनसे शहर अध्यक्ष केल्याने अनेक मनसैनिक व पदाधिकारी नाराज झाले आहेत . अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे सावंत यांच्या कडे दिले आहेत .
राणे यांना जाधव यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी शहर अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र दिले . राणे यांच्या नियुक्ती बद्दल सावंत सह अनेक पदाधिकारी नाराज झाल्याचे ठाकरे यांच्या पर्यंत पोहचले असून मंगळवारी ठाकरे हे सावंत सह जुन्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत . ह्या प्रकारा बद्दल अविनाश जाधव यांच्या वर सुद्धा अनेक मनसैनिक नाराज झाल्याचे सूत्रांनी सांगितले.