मीरा-भाईंदर मनपाकडून प्रामाणिक करदात्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:54 IST2021-02-25T04:54:52+5:302021-02-25T04:54:52+5:30

मीरारोड : मीरा-भाईंदर महापालिकेने प्रामाणिक करदात्यांना कोरोना संसर्गाच्या अडचणीच्या काळात कोणतीच सवलत-सूट दिली नसली तरी वर्षानुवर्ष कर न भरणाऱ्या ...

Mira-Bhayander Corporation mocks honest taxpayers | मीरा-भाईंदर मनपाकडून प्रामाणिक करदात्यांची थट्टा

मीरा-भाईंदर मनपाकडून प्रामाणिक करदात्यांची थट्टा

मीरारोड : मीरा-भाईंदर महापालिकेने प्रामाणिक करदात्यांना कोरोना संसर्गाच्या अडचणीच्या काळात कोणतीच सवलत-सूट दिली नसली तरी वर्षानुवर्ष कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना मात्र लॉकडाऊनमुळे सवलतीचा हवाला देऊन तब्बल ७५ टक्के व्याज माफ करण्याचा निर्णय अभय योजनेच्या नावाखाली घेतला आहे. थकबाकीदारांना फायदा करून देण्याच्या प्रकारामुळे प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात गेल्या वर्षी सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता नोकरी-व्यवसाय ठप्प होते. त्यावेळी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने चालू आर्थिक वर्षातील मालमत्ताकर ऑक्टोबर २०२० पर्यत भरल्यास निवासी व वाणिज्य वापरातील मालमत्तांना ५० टक्के सवलत देण्याचा ठराव केला होता. त्याच वेळी थकबाकीदारांचे व्याज सुद्धा १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सवलतीच्या अपेक्षेने मोठ्या संख्येने प्रामाणिक करदात्यांनी मालमत्ताकर भरला. परंतु, आजतागायत सत्ताधारी भाजपा व प्रशासनाने प्रामाणिक करदात्यांना कोणतीच सवलत दिली नाही. एकीकडे दरवर्षी नियमितपणे कर भरणाऱ्यांना कोणतीच सवलत न देताना आता अभय योजनेच्या नावाखाली थकबाकीदारांना मात्र थकीत व्याजावर तब्बल ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यापासून कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर सवलतीचा वर्षाव केला जात आहे. त्यामुळे नियमित कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना व्याजाची केवळ २५ टक्केच रक्कम भरावी लागणार आहे.

थकबाकीदारांवर कृपादृष्टी दाखवून महापालिकेकडून २५ फेब्रुवारी ते १५ मार्च या १९ दिवसांच्या कालावधीसाठी ही अभय योजना राबवली जाणार आहे. या कालावधीत मालमत्ता कराच्या रकमेसह आकारलेल्या व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास त्यांना व्याजाच्या रकमेत ७५ टक्के माफी मिळणार आहे.

Web Title: Mira-Bhayander Corporation mocks honest taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.