मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणूक अनुषंगाने मंगळवारी जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये अनेक माजी नगरसेवकांचे पत्ते कापले गेले आहेत. त्यामुळे राजकीय पुनर्वसनसाठी अनेकांची धडपड सुरू झाली आहे, तर मागील वेळेप्रमाणे प्रभाग आरक्षण पडल्याने अनेकांना दिलासा देखील मिळाला आहे.
महापालिकेच्या प्रभाग निहाय जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये मीरारोड पूर्वेच्या प्रभाग १२ मधील दोन जागा खुल्या वर्गातील महिलांसाठी तर १ जागा इत्तर मागासवर्ग साठी राखीव होऊन केवळ एकच जागा सर्वसाधारण गटात राहिली आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी भाजपाचे माजी उपमहापौर हसमुख गेहलोत आणि माजी सभापती अरविंद शेट्टी यांच्या पैकी एकाचा पत्ता कापला जाणार आहे.
उत्तन परिसरातील प्रभाग २४ हा यंदा देखील केवळ ३ नगरसेवकांचा असून त्यातही इत्तर मागासवर्गसाठी १ तर दोन जागा खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याने शिंदेसेनेचे शहर प्रमुख तथा मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांची निवडणूक लढवण्याची इच्छा संपुष्टात आली आहे. २०१७ साली एलायस बांड्या यांच्यासाठी वरिष्ठांच्या आश्वासनानंतर डिमेलो यांनी पालिका निवडणूक लढवली नव्हती. यंदा त्यांना उमेदवारी देणे निश्चित होते, मात्र आरक्षणाने शिंदेसेनेची येथील समीकरणे बिघडू शकतात.
काशिमीरा भागातील प्रभाग १४ मध्ये भाजपाच्या माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांना दिलासा मिळाला असून, अनुसूचित जातीच्या महिलेसाठी १४ अ आरक्षित झाला आहे. तर गेल्या वेळी महिलेसाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण असल्याने यंदा ते अनुसूचित जमातीसाठी असल्याने माजी भाजपा नगरसेविका सुजाता पारधी यांचा पत्ता कट होऊ शकतो. ह्याच प्रभागातून इत्तर मागासवर्ग आरक्षणातून निवडून आलेल्या भाजपच्या सचिन म्हात्रे यांना सदर आरक्षण महिलेसाठी राखीव होऊन खुल्या सर्वसाधारण वर्गा साठी एकच जागा उरली आहे. त्यामुळे म्हात्रे सह माजी नगरसेविका मीरादेवी यादव आणि ज्येष्ठ पदाधिकारी अनिल भोसले आदींमध्ये उमेदवारीसाठी चुरस लागणार आहे.
मीरारोड प्रभाग क्र. १९ मध्ये १ ओबीसी व २ महिला आरक्षण पडून सर्वसाधारण वर्गासाठी एकच जागा असल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक राजीव मेहरा व अनिल सावंत यांच्यात उमेदवारीसाठी जुंपणार आहे.
ओबीसी आरक्षणातून भाईंदर पूर्वेला प्रभाग ३ मधून निवडून आलेले भाजपाचे गणेश शेट्टी आणि प्रभाग ६ मधून निवडून आलेले भाजपाचे ध्रुवकिशोर पाटील यांच्या जागा ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांना सर्वसाधारण गटातून लढावे लागणार आहे.
मीरारोडच्या प्रभाग १३ मधील १ जागा ओबीसी महिलेसाठी, १ जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी तर १ जागा सर्वसाधारण महिला आणि १ जागा सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित आहेत. ओबीसी महिला झाल्याने मागील वेळी आरक्षणातून निवडून आलेल्या संजय थेराडे यांची अडचण झाली आहे. कारण ह्याच प्रभागातून सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेले माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांना की थेराडे यांना भाजपाची उमेदवारी देणार? याची चर्चा आहे. गेल्या वेळी अनुसूचित महिला आरक्षण असल्याने रुपाली मोदी निवडून आल्या होत्या, मात्र हे आरक्षण आता महिलेसाठी नसल्याने अनुसूचित जातीतील दावेदार वाढणार आहेत.
प्रभाग ११ मधील अनुसूचित जातीची जागा यंदा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाल्याने शिंदेसेनेचे माजी नगरसेवक अनंत शिर्के यांचा पत्ता पण कापला जाण्याची शक्यता आहे.