"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
By धीरज परब | Updated: December 19, 2025 20:02 IST2025-12-19T20:01:56+5:302025-12-19T20:02:53+5:30
शनिवारी उपमुख्यमंत्री यांच्या निर्धार मेळाव्यात शिवसेनेची ताकद दाखवणार

"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपासोबत युतीमध्ये शिवसेनेला ५० टक्के जागा हव्यात, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली. २०१७च्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे. शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. २० डिसेंबरला होणाऱ्या निर्धार मेळाव्यात आमची वाढलेली ताकद दाखवून देऊ, असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे मीरा भाईंदरचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी ९५ पैकी ६५ जागा स्वतः आणि १७ जागा शिवसेनेला देण्यासह उर्वरित १३ जागा वाटून घेण्याचा फॉर्म्युला दिला आहे. २१ डिसेंबरला भाजपाचा संकल्प मेळावा होत आहे.
सर्व ९५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार तयार
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीत महायुतीने लढायचे सांगितल्याने सर्व महापालिका निवडणुकीत युती होत आहे. आमची युतीची इच्छा आहे. पण भाजपाच्या स्थानिक नेत्यांची युती करायची इच्छा नाही. धोका नको म्हणून सर्व ९५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार तयार असून मुलाखती सुरु आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना २०१७ आणि आताच्या स्थितीत फरक असल्याचे आपण निदर्शनास आणून दिले आहे. त्यावेळी देखील शिवसेनेचे ८ ते १० उमेदवार हे अवघ्या काही मतांनी हरले होते. गेली ३ वर्ष पालिकेत कोणाचीही सत्ता नाही. त्या ३ वर्षात आपण अनेक विकास कामे केली आहेत," असे सरनाईक म्हणाले.
"मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी १८०० कोटींचा निधी दिला. शहरात लोकांना त्याचा परिणाम दिसत आहे. मेट्रो प्रकल्प झाला, आपण मेट्रो खाली तीन उड्डाणपूल करून घेतले. सूर्या पाणी पुरवठा योजना मार्गी लावली. त्यातून ६ महिन्यात पाणी मिळेल. बाळासाहेब ठाकरे कलादालन, लता मंगेशकर नाट्यगृह, गिल्बर्ट मेंडोन्सा ट्राफिक पार्क, मेंडोन्सा यांच्या नावाने ४०० खाटांचे रुग्णालय बांधले जात आहे. बीएसयुपी योजनेत घरे वाटप, वारकरी भवन, मराठा भवन, सरदार वल्लभभाई पटेल भवन, महाराणा प्रताप भवन, विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती, संगीत कारंजी विविध समाज भवन आदी अनेक विकास कामे करण्यात आली आहेत," अशी यादीच त्यांनी वाचून दाखवली.
"काहींना वाटते की शिवसेनेची मीरा भाईंदरमध्ये ताकद नाही. मात्र त्यांना दाखवून देऊ की शिवसेनेची ताकद किती आहे. शनिवारी मीरारोडच्या शिवार उद्यानात ४ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना निर्धार मेळावा आहे. तेव्हा सगळ्यांनाच आपली ताकद दिसेल," असे सरनाईक म्हणाले.