मीरा भाईंदर - वसई विरार गुन्हे शाखा ४ च्या पथकाने तेलंगणाच्या राचकोंडा भागातील एक मेफेड्रोन अर्थात एमडी अमली पदार्थ बनवणारा कारखाना शुक्रवारी उध्वस्त केला आहे. मालकासह त्याच्या साथीदारास अटक केली असून काही हजार कोटींचे एमडी बनवता येईल इतके रसायन तसेच सुमारे ११ कोटींचे एमडी जप्त केले आहे. मीरा भाईंदरच नव्हे राज्यात व देशात देखील ह्या कारखान्यातून एमडी पुरवले जात असल्याची शक्यता आहे.
मीरारोड मध्ये ८ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख व पथकाने काशिमीरा नाका येथून फातिमा मुराद शेख ( वय २३) रा. काजूपाडा, घोडबंदर मार्ग हिला २१ लाख १० हजार किमतीचा १०५ मेफेड्रोन अमली पदार्थासह अटक केली होती. काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी अमली पदार्थ विक्री व तस्करी विरोधात सखोल चौकशी करून कारवाईचे आदेश दिल्या नंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद बडाख सह सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक उमेश भागवत व पथकाने तपास चालवला होता. फातिमा हिच्या चौकशीत पुढची साखळी जोडत पोलिसांनी मीरारोड परिसरातून आता पर्यंत १० जणांना अटक केली होती.
तर एमडी आणतात कुठून याचा तपास करता तेलंगणा राज्यातील हैद्राबाद जवळच्या राचकोंडा भागात कारखाना असल्याचे समजले. शुक्रवारी पोलीस पथकाने राचकोंडा येथे जाऊन एमडी बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. त्या धाडीत कारखाना मालक व त्याचा साथीदार ह्या दोघांना पकडण्यात आले.
कारखान्यात सुमारे ११ कोटी किमतीचे साडे पाच किलो तयार एमडी तसेच एमडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य व यंत्र , साधन सामुग्री पोलिसांना सापडले. एमडी साठी लागणारे सुमारे ३० ते ३५ हजार लिटर रासायनिक द्रव्य कारखान्यात आढळून आले. ह्या रसायनातून काही हजार कोटी रुपयांचे एमडी बनवले जाणार होते असे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी कारखाना सील करत आतील यंत्र साहित्य जप्त केले आहे.