Minor thief arrested for stealing women's gold chain in Thane | ठाण्यात महिलांची सोनसाखळी जबरीने चोरी करणाऱ्या अल्पवयीन चोरटयास अटक

कापूरबावडी पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कारवाईसोनसाखळीसह मोटारसायकलही हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मोटारसायकलवरुन महिलांची सोनसाखळी जबरीने चोरी करणाºया एका १७ वर्षीय अल्पवयीन चोरटयास कापूरबावडी पोलिसांनी अटक केल्याची माहिती मंगळवारी दिली. त्याच्याकडून जबरी चोरीतील ऐवज तसेच चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
बाळकूम पाडा क्रमांक एक येथील रहिवाशी जुलीयाना रईस (२३) या ९ आॅक्टोबर रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास बाळकूम नाका येथील साई मंदिराच्या जवळून पायी जात होत्या. त्याचवेळी एका काळया रंगाच्या मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळयातील दहा ग्रॅम वजनाची ५० हजारांची सोनसाखळी जबरीने हिसकावून बाळकूम साकेत रोडकडे पलायन केले. याप्रकरणी १० आॅक्टोबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा करण्यात आला होता. संबंधित तक्रारदार महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे मोटारसायकल आणि आरोपींचा कापूरबावडी पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही मध्ये मिळालेल्या चित्रणामध्ये पळालेला चोरटा हा कळवा येथील रहिवाशी असल्याचे आढळले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने या अल्पवयीन चोरटयाला कळवा भागातून सापळा रचून १६ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले. त्याला भिवंडी येथील बालनिरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सखोल चौकशीमध्ये त्याच्याकडून जप्त केलेली मोटारसायकल त्याने कळवा येथून चोरल्याचे उघड झाले. तर जबरी चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल त्याने मुलूंड भागातून चोरल्याची त्याने कबूली दिली. त्यांच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Minor thief arrested for stealing women's gold chain in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.