अवघ्या सहाशे रुपयांसाठी अल्पवयीन मुलीची आत्महत्या
By जितेंद्र कालेकर | Updated: February 6, 2025 20:06 IST2025-02-06T20:06:00+5:302025-02-06T20:06:24+5:30
गहाळ झालेल्या पैशांबाबत विचारणा केल्याच्या रागातून टोकाचे पाऊल

अवघ्या सहाशे रुपयांसाठी अल्पवयीन मुलीची आत्महत्या
ठाणे : गहाळ झालेल्या सहाशे रुपयांबाबत शेजाऱ्याने विचारणा केल्याच्या रागातून लतिका अरुण शेट्टी या १२ वर्षीय मुलीने तिच्या ओढणीने गळफास घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
कळव्यातील घोलाईनगर भागातील शेट्टी कुटुंबाकडे त्याच परिसरातील मुले शिवजयंतीची वर्गणी घेण्यासाठी गेली, त्यावेळी हा प्रकार समोर आला. या मुलीने पोटमाळ्याच्या खिडकीला गळफास घेतल्याचे ५ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री ८ च्या सुमारास आढळले. त्याआधी ती शाळेतून ५.३० च्या सुमारास घरी परतली. सायंकाळी ७ च्या दरम्यान गहाळ झालेल्या सहाशे रुपयांबद्दल शेजारील मदन गुप्ता यांनी तिच्याकडे विचारणा केली. तिने आपल्याला त्याबद्दल माहीत नसल्याचे सांगितले, परंतु, त्यावेळी बरेच लोक जमा झाले. यातून अपमान झाल्याची तिची भावना बळावली. याच वैफल्यातून तिने अचानक घराच्या पोटमाळ्याला असलेल्या खिडकीला ओढणीने गळफास घेतला. घरात आत कडी लावलेली असल्यामुळे परिसरातील लोकांनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढले. त्याचदरम्यान, हरवलेल्या सहाशे रुपयांपैकी चारशे रुपयेही मिळाले. त्यामुळे मुलीने नाहक आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विनायक करडे तपास करीत आहेत.