रेल्वे रुळांवर दगड ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:38 IST2021-08-29T04:38:28+5:302021-08-29T04:38:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : सहज मजा म्हणून मुलांनी रेल्वे रुळांवर छोटे दगड ठेवल्याची घटना ठाकुर्ली रेल्वेस्थानकादरम्यान गुरुवारी ...

रेल्वे रुळांवर दगड ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : सहज मजा म्हणून मुलांनी रेल्वे रुळांवर छोटे दगड ठेवल्याची घटना ठाकुर्ली रेल्वेस्थानकादरम्यान गुरुवारी (दि. २६) संध्याकाळी घडली. कर्जत मार्गावर जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनच्या सतर्कतेमुळे ते कृत्य निदर्शनास आल्यावर त्यांनी त्याबाबत लगेचच स्थानक प्रशासनाला कळविले. त्यामुळे पुढील अपघात टळला असला तरी हे कृत्य करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यासोबत आणखी कोण होते याबाबतची चौकशी करून नंतर त्याला भिवंडी बालसुधारगृहात पाठविले.
या संदर्भात पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वेस्थानकादरम्यान कि.मी. ४८/७० डाऊन दिशेकडे धिम्या मार्गावर काही लहान दगड ठेवले होते. ते दगड रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतर्कपणे बाजूला केले. त्यानुसार त्यांनी आरपीएफ पोलिसांसमवेत घटनास्थळाजवळ तपास सुरू केला. परंतु, त्यावेळी काहीएक माहिती न मिळाल्याने नमूद पोलीस अंमलदारांनी पोलीस ठाण्यात येऊन त्याच दिवशी रात्री ८.१५ वाजता माहिती कळविली. त्यानुसार मोटरमनने त्या घटनेबाबत माहिती नियंत्रण कक्षात कळविली व डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात नमूद घटनेच्या अनुषंगाने गोपनीय शाखेतर्फे अज्ञात व्यक्तींविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानुसार पुढील तपासादरम्यान पोलिसांनी शुक्रवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्ही फुटेजद्वारे एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. त्या तपासादरम्यान त्याची आईदेखील पोलिसांच्या संपर्कात आली असून तिला सगळी माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या मुलाला भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठवल्याची माहिती ढगे यांनी दिली. त्यात आणखी एक सहकारी असल्याचे सांगण्यात आले; पण त्याचा काही शोध लागला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले; त्यामुळे आणखी कोणी आहे की नाही, हे आताच सांगता येणार नसल्याचे सांगण्यात आले.
------------