एमआयएम नेते वारिस पठाण यांना मीरारोडमध्ये येण्याआधीच घेतले ताब्यात
By धीरज परब | Updated: February 19, 2024 20:45 IST2024-02-19T20:44:36+5:302024-02-19T20:45:08+5:30
अयोध्येत श्रीराम मंदिर उदघाटनच्या आदल्या रात्री मीरारोडच्या नया नगरमध्ये रात्री उशिरा काढलेली मिरवणूक व घोषणाबाजी वरून वाद झाला होता.

एमआयएम नेते वारिस पठाण यांना मीरारोडमध्ये येण्याआधीच घेतले ताब्यात
मीरारोड - मीरा भाईंदर शहरात दोन धर्मात तेढ निर्माण झाल्याच्या घटनां प्रकरणी गुन्हे दाखल होऊन अनेक आरोपी अटकेत असताना व शहरात शांतता निर्माण झाली असताना शिवजयंती दिवशी मीरारोड भागात येत असलेले एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांना पोलिसांनी दहिसर चेक नाका येथूनच ताब्यात घेतले.
अयोध्येत श्रीराम मंदिर उदघाटनच्या आदल्या रात्री मीरारोडच्या नया नगर मध्ये रात्री उशिरा काढलेली मिरवणूक व घोषणाबाजी वरून वाद झाला होता . त्या नंतर शहरात सुद्धा त्याचे पडसाद उमटले होते . दोन गटातील वाद पाहता पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करत काही आरोपीना अटक केली होती . त्या दरम्यान शहरा बाहेरून भाजपाचे काही नेते येऊन वादग्रस्त विधाने केल्याने शहरातील राजकीय नेत्यांसह पत्रकार , जागरूक नागरिक व विविध संस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत बाहेरून येणाऱ्या नेत्यांना शहरात प्रवेश बंद करा अशी मागणी केली होती.
भाईंदर येथे पत्रकारांनी बोलावलेल्या सर्वपक्ष व पोलीस , पालिका यांच्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा सर्वानी मांडत बाहेरच्या नेत्यांना नो एंट्री ची मागणी पोलिसां कडे केली होती . त्या नंतर शहरातील वातावरण सुरळीत होत असताना तसेच १० वी व १२ वी च्या परीक्षा सुरु होणार असताना सोमवारी एमआयएम चे माजी आमदार वारीस पठाण हे त्या जानेवारी मधील घटने संदर्भात मीरारोड मध्ये येणार असल्याचे समजल्याने काशीमीरा व नया नगर पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक मनाई नोटीस तयार केली.
पठाण यांना दहिसर चेकनाका येथेच मुंबई पोलीस आणि मीरा भाईंदर पोलिसांनी अडवून परत जाण्यास सांगितले असता त्यांनी नकार देत रस्त्यावर बसले . त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले . नंतर उशिरा त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. यावेळी पठाण यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. धार्मिक तेढ निर्माण करणारी भडकाऊ वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना शहरात प्रवेश देऊ नये अशी मागणी पुन्हा होत आहेत.