आगामी काळात मुंब्य्रात राष्ट्रवादीसमोर एमआयएमचे आव्हान
By Admin | Updated: February 24, 2017 07:08 IST2017-02-24T07:08:11+5:302017-02-24T07:08:11+5:30
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मुंब्य्राचा गड राष्ट्रवादीने कायम राखला असला, तरी एमआयएमला

आगामी काळात मुंब्य्रात राष्ट्रवादीसमोर एमआयएमचे आव्हान
कुमार बडदे / मुंब्रा
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मुंब्य्राचा गड राष्ट्रवादीने कायम राखला असला, तरी एमआयएमला या निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे आगामी काळात राष्ट्रवादीला एमआयएमशी कढवी झुंज द्यावी लागणार असल्याचे गुरुवारच्या निकालावरून दिसून आले.
निवडणुकीपूर्वी तसेच निवडणुकीत औवेसी बंधूच्या सभेला झालेल्या गर्दीमुळे एमआयएम मुंब्य्रात राष्ट्रवादीला कढवी झुंज देण्यासाठी सिद्ध झाल्याची चर्चा सुरू होती. सभांना झालेल्या गर्दीमुळे राष्ट्रवादीच्या गोटामध्येदेखील खळबळ उडाली होती. मुंब्रा-कौसा परिसरातून पक्षाने उमेदवारी दिलेल्या १७ पैकी फक्त दोन उमेदवार निवडून आले. तर, एकाचा अवघ्या दीडशे मतांनी पराभव झाला. तसेच १० उमेदवार मतांच्या क्र मवारीत दुसऱ्या स्थानावर आहेत. पक्षाला मिळालेल्या या यशाबद्दल एमआयएमचे स्थानिक नेते समाधानी असून आगामी काळात पक्षवाढीसाठी अधिक प्रयत्न करून राष्ट्रवादीसमोर कडवे आव्हान उभे करणार असल्याची माहिती एमआयएमचे कमर खान यांनी लोकमतला दिली.
मुंब्य्रात शिवसेनेला धक्का
शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या तुल्यबळ उमेदवारांमुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या प्रभाग क्र मांक ३१ मधून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा दारु ण पराभव झाला असून या प्रभागातून राष्ट्रवादीचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. तसेच शिवसेनेच्या पाठिंब्यावर ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंब्रा विकास आघाडीची स्थापना करून मुंब्य्रातील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बालाजी काकडे तसेच इतर उमेदवारांचादेखील पराभव झाला.
यामुळे शिवसेनेला मुंब्य्रात मोठा धक्का बसला असून पक्षाचे आव्हान संपुष्टात आले आहे. मागील १० वर्षांपासून ठाकूरपाडा, संजयनगर आदी भागांचे प्रतिनिधित्व केलेल्या सुधीर भगत आणि निवडणुकीच्या आधी चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेल्या राजन किणे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्र मांक ३१ ची निवडणूक दोन्ही पक्ष तसेच उमेदवारांनी प्रतिष्ठेची केली होती.
भगत यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्य्रातील चौकसभेत भाषण केले होते. परंतु, त्यानंतरही भगत आणि त्यांच्याबरोबर निवडणूक लढवणारी त्यांची पत्नी आणि इतर दोन उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.
राष्ट्रवादीने गड राखला
मुंब्रा : ठामपाच्या सातव्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मुंब्य्राचा गड कायम राखला. येथील २३ पैकी तब्बल १८ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्या पक्षाच्या विभागीय अध्यक्षांसह इतर काही इच्छुकांच्या समर्थकांनी आमदार आव्हाड यांचे फोटो तसेच पक्षाचे झेंडे जाळून जाहीर निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे मुंब्य्रातून राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु आव्हाडांनी वेळीच नाराजांची समजूत काढल्यामुळे तसेच निवडून आलेल्या उमेदवारांचे मतदारांशी असलेले वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध याचप्रमाणे आव्हाड यांनी मागील सात वर्षांत केलेली विकासकामे आणि ठिकठिकाणी जाऊन मतदारांशी साधलेल्या थेट संपर्कामुळे राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्याचे मत प्रभाग क्र मांक ३१ मधून विजयी झालेल्या राजन व मोरेश्वर या किणे बंधंूनी आणि सुनीता सातपुते तसेच इतर काही नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यक्त केले. खुद्द आव्हाड यांनी विजयाचे श्रेय मुंब्य्रातील जनतेचे असून त्यांनी पक्षावर दाखवलेल्या विश्वासामुळे निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाल्याचे मत ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.