Thane Update: ठाण्यातील तलाव, खाडी आणि विहिरीच्या पाण्याची गुणवत्ताही खालावल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालात ३५ तलावांपैकी बहुतेक तलाव हे मध्यम प्रदूषित असल्याचे आढळले आहेत. खाडीच्या पाण्यात अमोनिकल नायट्रोजनची पातळी वाढल्याचे आढळून आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला ३५ तलाव शिल्लक आहेत. या तलावांच्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे, दिवा येथील तलावात पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन हा मानांकनानुसार कमी आढळला.
वाचा >>मेट्रो येणार; ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार
नायट्रोजनयुक्त रसायने, खतांचा अतिरेक असलेले सांडपाणी, जनावरांचे मलमूत्र किंवा मैलशुद्धीकरण नसलेले सांडपाणी, तलावातील निर्माल्य यामुळे तलावाचे प्रदूषण वाढत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात काढण्यात आला आहे.
नाल्यातील पाण्याची गुणवत्ताही ढासळली
ठाणे शहरात असलेल्या नाल्यातील पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली असून, त्यात ऑक्सिजनची पातळी कमी आढळली आहे.
अमोनिकल नायट्रोजनचे प्रमाणही अधिक आहे. त्यातही हेच पाणी खाडीत जात असल्याने खाडीचे पाणीही दूषित होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
घनकचऱ्यामुळे दूषित
९३ विहिरींची गुणवत्ता महापालिकेने तपासली असता, गढूळपणा आढळला आहे. विहिरींचे पाणी घनकचऱ्यामुळे दूषित झाले आहे, तसेच कूपनलिकांचे पाणीही पिण्यास अयोग्य असल्याचे पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे.