मीटरविना रिक्षा डोंबिवलीत सुसाट

By Admin | Updated: November 9, 2016 03:37 IST2016-11-09T03:37:07+5:302016-11-09T03:37:07+5:30

मीटरनुसार रिक्षाभाडे आकारणे सक्तीचे असतानाही डोंबिवलीतील बहुतांश रिक्षाचालक या नियमाचे सर्रास उल्लंघन करीत आहेत

Metropolitan Rickshaw Dombivliyat Suasat | मीटरविना रिक्षा डोंबिवलीत सुसाट

मीटरविना रिक्षा डोंबिवलीत सुसाट

डोंबिवली : मीटरनुसार रिक्षाभाडे आकारणे सक्तीचे असतानाही डोंबिवलीतील बहुतांश रिक्षाचालक या नियमाचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. आरटीओचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आरटीओने सोमवारी ४२ रिक्षांविरोधात केलेली कारवाई ही तोंडदेखली आहे. प्रशासनाने सातत्याने अशी कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत त्रस्त प्रवाशांनी व्यक्त केले.
डोंबिवलीत शेअर, मीटर तसेच थेट भाडे पद्धतीवर रिक्षा सेवा सुरू आहे. शेअर पद्धतीचे मार्ग आणि त्यांचे भाडेदर आरटीओने निश्चित केला आहेत. मीटर पद्धतीसाठी पहिल्या दीड किलोमीटरला आरटीओने १९ रुपये दर ठरवून दिला आहे. मात्र, शेअर मार्गांशिवाय अन्य मार्गांवर रिक्षाचालक मीटर पद्धतीप्रमाणे भाडे आकारत नाहीत. ते मनमानी करत ठोस पद्धतीने भाडे आकारतात. मीटर टाकण्यास सांगूनही ते सुरू केले जात नाही. त्यामुळे अनेकदा प्रवासी-रिक्षाचालकांमध्ये वाद होतात. काही वेळा प्रवाशांनी मीटरचा आग्रह धरल्याने त्यांना रिक्षेतून उतरवल्याच्या घटना घडल्या आहेत.
हे सगळे अनुभव डोंबिवलीकरांना नित्याचे असल्याने मीटरसक्ती हवीच, असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. शेअरच्या सुविधांसंदर्भातही काही नियम लावावेत, समान आकारणी होणे अपेक्षित असताना त्यातही काही ठिकाणी तफावत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. मीटरप्रमाणे भाडे न आकारणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) तातडीने कठोर उपाययोजना करावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
डोंबिवली रेल्वेस्थानकातून एमआयडीसी, ठाकुर्ली, खंबाळपाडा, सागाव, सागर्ली, आजदे या गावांसह अन्य मार्गांवर रिक्षाचालक जादा भाडे आकारतात, असा प्रवाशांचा अनुभव आहे. मीटर कोणीही सुरू करत नाही. याबाबत जाब विचारल्यास रिक्षाचालक-प्रवाशांशी हुज्जत घालतात. हे प्रकार टाळण्यासाठी आणि पारदर्शी कारभारासाठी मीटरसक्ती आवश्यक आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
आरटीओने सोमवारी ४२ रिक्षांवर कारवाई केली. मात्र, ती नाममात्र आहे, अशी स्पष्ट असल्याची टीका नागरिकांनी केली. दिवाळीच्या दिवसांमध्ये रस्त्यावर कमी रिक्षा आल्या. त्यामुळे प्रवाशांची पंचाईत झाली होती. अनेक रिक्षाचालकांनी त्या संधीचा फायदा उठवत जास्त भाडे आकारण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनेक ठिकाणी वाद झाले.

Web Title: Metropolitan Rickshaw Dombivliyat Suasat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.