लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : बहुचर्चित ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो प्रकल्प पाच मधील दुसऱ्या फेज मधील भिवंडी- कल्याण मार्गाचा विकास आराखडा अजूनही बासनात असल्याने ठाणे- भिवंडी या पहिल्या फेज मधील काम ६० टक्के पूर्ण होत आले असताना पुढील काम अडखळत सुरू असल्याने सध्या तरी ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो भिवंडीत अडकली आहे. धामणकर नाक्यापर्यंत मेट्रोचे काम मोठ्या ताकदीने व जलद गतीने करण्यात आले. मात्र त्यापुढे हे काम सरकले नसल्याने मेट्रो प्रकल्पाचे काम याच ठिकाणी येऊन थांबले आहे.
बाळकूम- भिवंडी- कल्याण नाकामार्गे कल्याण या २४. ९० किमी लांबीच्या ८४१६. १५ कोटी रुपये खर्च केल्या जाणाऱ्या या मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु भिवंडीतील मार्ग आजही निश्चित झाले नसल्याने मेट्रो जाणार कुठून हा प्रश्न उपस्थित होत आहे. या मेट्रोचे नियोजित भिवंडी शहरातील मार्ग अंजूरफाटा, धामणकर नाका, कल्याण नाका येथून राजनोली नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार होती. परंतु त्याच दरम्यान कल्याण नाका ते राजनोली नाका दरम्यान एमएमआरडीएने उड्डाणपूल बनविल्याने या मार्गावर पुन्हा मेट्रो साठी मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरण करण्याची गरज आहे. त्याला येथील व्यापारी व स्थानिकांचा विरोध होत आहे .त्यामुळे वंजारपट्टी नाका, पोगाव मार्गे मेट्रो मार्ग वळविण्याचा एक पर्याय समोर आला परंतु तो खर्चिक व कमी उपयोगात येणार असल्याने त्यास आजही प्रतिसाद मिळाला नाही.
भिवंडीतून जाणाऱ्या या मेट्रोचे काम बाळकूम ते भिवंडीतील धामणकर नाकापर्यंत काम युद्धपातळीवर सुरु असून काही ठिकाणी पिलर व त्यावरील आडव्या सळई टाकून काम पूर्ण होत आले. पण त्यापुढे धामणकर नाका ते कल्याणच्या दिशेने जाणारा मार्ग अजूनही निश्चित नसून या कामाबाबत निविदा प्रक्रियाही सुरू झाली नसल्याने १८ ऑक्टोबर २०१९ रोजी सुरू झालेला हा प्रकल्प २०२२ मध्ये पूर्णत्वास जाणार होता. परंतु ठाणे येथून सुरू झालेले काम भिवंडीतील धामणकर नाका येथे येऊन थांबले असल्याने या कालावधीत पूर्ण होईल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यामुळे भिवंडीकरांच्या मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्यास अजून नेमका किती कालावधी लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.