Mera-Bhayander Municipal Corporation's 'transport' wastage | मीरा-भाईंदर पालिकेच्या ‘परिवहन’चा बोजवारा
मीरा-भाईंदर पालिकेच्या ‘परिवहन’चा बोजवारा

मीरा रोड - केंद्र शासनाकडून फुकटात बस मिळूनदेखील त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात नाकर्तेपणा दाखवणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ५८ पैकी जेमतेम २० बसच सध्या प्रवाशांच्या सेवेत कशाबशा सुरू आहेत. अनेक बसमार्ग बंद करण्यासह फेºया कमी करण्याची नामुश्की पालिकेवर ओढवली आहे.
केंद्रातील काँग्रेस आघाडीच्या काळात मीरा-भार्इंदर महापालिकेला जेएनएनयूआरएम-२ मधून ९० बस मिळाल्या होत्या. काही वर्षे बस तशाच पडून राहिल्या. त्यानंतर, मोठा गाजवाजा करत २०१५ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच बस सेवेत आणण्यात आल्या. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने ४३ सर्वसाधारण बस, १० मिनीबस व पाच वातानुकूलित व्होल्वो बस अशा एकूण ५८ बस प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आल्या. या नव्या कोºया ५८ बसचा तीन ते चार वर्षांतच खुळखुळा झाला आहे. महापालिकेने बसच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबत नेहमीच हलगर्जीपणा केल्याने नव्या बस भंगार झाल्या आहेत. बसची नियमित दुरुस्ती, सर्व्हिसिंग, धुलाई आदी सर्वच बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. टायर नसल्याने बस सातत्याने बंद पडून असतात. कधी इंधनाला पैसे नाही म्हणूनदेखील बस जागेवर उभ्या राहिल्या आहेत. त्यातच, बसच्या टायरखरेदीपासून अनेक बाबतीत गैरप्रकार झाल्याचे आरोप होत असताना त्याचीदेखील कसून चौकशी केली जात नाही. सध्या ५८ मधून जेमतेम २० बसच रस्त्यावर काढल्या जात आहेत. बाकीच्या ३८ बस टायर, ब्रेकडाउनसह विविध कारणांनी देखभाल-दुरुस्तीअभावी धूळखात पडलेल्या आहेत. सध्या सर्वसाधारण ४३ बसपैकी केवळ १५ बस सुरू आहेत. दहा मिनीबसपैकी दोन, तर वातानुकूलित पाच बसपैकी तीन बसच चालत आहेत.
बसच नसल्याने मीरा रोड ते रामदेव पार्क मार्ग क्र. २१, मीरा रोड ते हाटकेश बसमार्ग क्र. २२ , बोरिवली बसमार्ग क्र. १४ आदी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असणारे मार्गच बंद करण्यात आले आहेत. वास्तविक रामदेव पार्क, हाटकेश भागात मोठी लोकवस्ती असून नागरिकांसह विद्यार्थ्यांचेही मीरा रोड स्थानक गाठण्यासाठी बस नसल्याने हाल होत आहेत. नाइलाजाने रिक्षासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.

प्रवाशांची गर्दी असलेला बोरिवलीचा मार्गदेखील बंद केल्याने मोठी गैरसोय

बोरिवलीचा गर्दीचा मार्गदेखील बस नसल्याने बंद केला आहे. मीरा रोड-ठाणे व भार्इंदर-ठाणे या मार्गांवर वातानुकूलित बस सुरू असून साधारण बस बंद केल्या आहेत. खानापूर्ती म्हणून बंद केलेल्या मार्गावर एखादी बस चालवली जाते.

लोकप्रतिनिधी, अधिकारी स्वत:च्या वाहनांचे भत्ते नियमित घेतात. पालिकेकडून मिळालेली वाहने त्यांना सुविधायुक्त हवी असतात. परंतु, नागरिकांसाठी असलेल्या परिवहन उपक्रमाच्या बसची देखभाल करण्यात स्वारस्य दाखवले जात नाही.

परिवहन उपक्र म चालवण्यास पालिकेने ठेकेदारास मंजुरी दिली असली, तरी बसची देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यामुळे बसच्या दुरवस्थेला अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.


Web Title:  Mera-Bhayander Municipal Corporation's 'transport' wastage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.