सोशल मीडियामुळे चिमुरड्याची अर्ध्या तासात झाली पालकांसोबत भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 06:15 IST2018-11-18T06:14:49+5:302018-11-18T06:15:44+5:30
सोशल मीडियामुळे तीन वर्षांचा चिमुरडा आणि त्याच्या पालकांची अर्ध्या तासात भेट झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी मुंब्य्रात घडली.

सोशल मीडियामुळे चिमुरड्याची अर्ध्या तासात झाली पालकांसोबत भेट
- कुमार बडदे
मुंब्रा : सोशल मीडियामुळे तीन वर्षांचा चिमुरडा आणि त्याच्या पालकांची अर्ध्या तासात भेट झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी मुंब्य्रात घडली.
येथील डोंगरेचाळीत राहत असलेल्या झयान सय्यद या तीन वर्षांच्या मुलाचे वडील शुक्रवारी चाळीतील प्रवेशद्वाराजवळ एका दुकानमालकाशी बोलत उभे होते. त्यावेळी त्यांची नजर चुकवून मुलगा लहान गेटमधून बाहेर पडला आणि चालत मुख्य रस्त्याजवळ आला. तेथे कावऱ्याबावºया नजरेने तो फिरत असल्यामुळे पादचाºयांनी त्याची विचारपूस केली. परंतु, तो त्याच्या पालकांची तसेच घराची व्यवस्थित माहिती देत नसल्यामुळे तो हरवला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून काही जागृत नागरिकांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. त्याच्या पालकांचा जलद तपास लागावा, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी त्याचा फोटो व्हॉट्सअॅप या सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे तो पोलीस ठाण्यात सुरक्षित असल्याची माहिती त्याचा फोटो सोशल मीडियावर बघणाºयांनी त्याच्या पालकांना दिली. त्याच्या वडिलांनी त्वरित पोलीस ठाण्यात धाव घेतली. ओळख पटवून त्याला ताब्यात घेऊन त्यांनी पासलकर यांचे आभार मानले.