Meera-Bhayandar BJP campaign 'Pride, Jeevan Hua Khushhal' campaign by the panel | मीरा-भाईंदर भाजपाची जाहिरात फलकांद्वारे 'गर्व है, जीवन हुआ खुशहाल' प्रचार मोहीम
मीरा-भाईंदर भाजपाची जाहिरात फलकांद्वारे 'गर्व है, जीवन हुआ खुशहाल' प्रचार मोहीम

मीरा रोड - मीरा-भाईंदर भाजपाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली प्रचार मोहीम जाहिरात फलकांच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यासाठी मुझे गर्व है असे घोषवाक्य वापरून पाणी, काँक्रिट रस्ते, उद्यान, मैदान, रुग्णालय, गॅस सिलिंडर आदी सुविधा मिळाल्याने जीवन सुखकर झाल्याचे नागरिकांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. सद्या भाजपाचे हे जाहिरात फलक चर्चेचा विषय ठरले आहेत.

२०१४ साली मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे नरेंद्र मेहता आमदार म्हणून निवडून आले. त्या नंतर भाजपा - शिवसेना युतीच्या पहिल्या महापौर गीता जैन निवडून आल्या. तर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपाने तब्बल ६१ जागा जिंकून एकहाती सत्ता महापालिकेवर आणली. मीरा भाईंदर भाजपाचेच नव्हे तर महापालिकेचे देखील सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे नरेंद्र मेहता आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठीचे पक्षाचे प्रबळ दावेदार आहेत. तर माजी महापौर गीता जैन यांनी देखील भाजपाच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी चालवली आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारासाठी मीरा भाईंदरमध्ये सद्या भाजपाच्या जाहिरातींचे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. मुझे गर्व है असे बोधवाक्य वापरून भाजपाने शहरातील नागरिकांचे जीवन आम्ही कसे आनंदी आणि सुसह्य केले आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. या प्रचारासाठी भाजपाने शहरातील मुलांसह महिला, ज्येष्ठ नागरिक, रिक्षाचालक आदींचा समावेश केलाय.

भाजपाच्या सर्वच जाहिराती हिंदी भाषेत आहेत. अब सिमेंट के रास्ते , हम सबके वास्ते म्हणणारा काशिमीरा गाव येथे राहणारा रिक्षा चालक गुलाबचंद पाल याचे छायाचित्र फलकावर आहे. खेलकुद हुआ आसान , हमारे घर के पास मैदान असं बेव्हर्ली पार्कचा गौरांश चौहान म्हणतोय. गोल्डन नेस्ट येथे राहणाराया रोशनी थापर म्हणतात की, आता गॅस सिलिंडर आल्याने आमच्या घरात धूर नाही तर आनंद असतो. शांती गार्डनच्या स्मिता मोरे म्हणतात की, प्रत्येक घरात नळ आणि पाणी आहे. अब जीवन हुआ खुशहाल , शहर में बेहतर अस्पताल असे म्हणताना मीरा रोडचे ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य रजनीकांत व रमाबेन पीथडिया फलकावर दिसतात.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे म्हणाले की, २०१४ साली मीरा भाईंदरमधील जनतेला आमदार नरेंद्र मेहता यांनी जी आश्वासने दिली होती ती आम्ही पूर्ण करत असल्याबद्दलची ही प्रचार मोहीम आहे. जे आम्ही केले आहे तेच सांगण्याचा प्रयत्न आहे. शहरात बंद असलेल्या नळ जोडण्या देणे पुन्हा सुरू केले तसेच ७५ दशलक्ष लिटर पाणी योजना सुरू केली.

शहरातील रस्ते आम्ही सिमेंटचे रस्ते बांधण्यास सुरुवात केली. आज भाईंदर पश्चिमेचा ६० फुटी मार्ग, जेसल पार्क, इंद्रलोक, नया नगर, काशिमीरा नाका हे रस्ते सिमेंटचे झालेत. उत्तन मार्गचे काम सुरू आहे. सिमेंट रस्त्यांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अन्य रस्ते देखील सिमेंट करणार आहोत. आमच्या काळात सर्वात जास्त उद्यानं आणि मैदानं विकसित केली आहेत. नव्याने अजून होणार आहेत. महापालिकेचे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आम्हीच सुरू केले आहे. शासनाला हस्तांतरीत करायचा निर्णय झाला असून, शासन ते पूर्ण क्षमतेने चालवणार आहे असे म्हात्रे म्हणाले.

आ. नरेंद्र मेहता आणि महापौर डिंपल मेहता यांच्या कार्यकाळात जी आश्वासनांची पूर्तता आम्ही केली त्याचाच प्रचार आम्ही करत असल्याचे म्हात्रे म्हणाले. तर शहरात सद्या २४ होर्डिंग्जवर भाजपाच्या या प्रचाराच्या जाहिराती प्रकाशित केल्या असल्याचे भाजपाचे यशवंत आशिनकर म्हणाले.


Web Title: Meera-Bhayandar BJP campaign 'Pride, Jeevan Hua Khushhal' campaign by the panel
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.