प्रशासनापुढे गोवरचं मोठं आव्हान, भिवंडीत 8 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू
By नितीन पंडित | Updated: November 25, 2022 17:35 IST2022-11-25T17:26:38+5:302022-11-25T17:35:59+5:30
विशेष म्हणजे या गोवर बाधित रुग्ण बालकांमधील अधिक रुग्ण बालके लसीकरण न झालेले आढळून आलेले आहेत

प्रशासनापुढे गोवरचं मोठं आव्हान, भिवंडीत 8 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू
भिवंडी - भिवंडी शहरात गोवरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, कस्तुरबा रुग्णालयात उपचारा दरम्यान इस्लामपूरा मिल्लत नगर येथील आठ महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. चिमुरडीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शहरातील गोवर बाधित मृत्यूचा आकडा तीन वर पोहचला आहे.सध्या शहरात संशयित रुग्णांची संख्या ४०० च्या जवळ पोहचली असताना ४६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या परिस्थितीत भिवंडी पालिका आरोग्य विभाग कामाला लागले आहे.
विशेष म्हणजे या गोवर बाधित रुग्ण बालकांमधील अधिक रुग्ण बालके लसीकरण न झालेले आढळून आलेले आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून आता लसीकरण मोहीम राबविण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना करीत असताना गोवर लसीकरण जनजागृती कार्यक्रमात धार्मिक धर्मगुरू, मौलवी, स्वयंसेवि संस्था,वैद्यकीय संघटनां सहभागी होत असताना आता या उपक्रमात शाळकरी विद्यार्थी सुद्धा जनजागृतीसाठी उतरली आहेत.
भिवंडी महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागा मार्फत भिवंडी शहरातील गोवर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रईस उर्दू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीचा आयोजन केले होते.रईस उर्दू हायस्कूल ते खजूरपुरा तेथून बाबूचुन्नी मार्केट,खुदाबक्ष हॉल ते पुन्हा रईस हायस्कुल या संपूर्ण अल्पसंख्यांक नागरी वस्ती असलेल्या विभागात ही प्रभात फेरी काढण्यात आली होती.वैद्यकीय विभागाच्या प्रमुख डॉ. बुशरा शेख तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी रईस उर्दू हायस्कूलचे प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी या उपक्रमामध्ये यामध्ये सहभागी झाले होते.