गुरुवारी निश्चित होणार ठाण्याचा महापौर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 01:09 AM2019-11-16T01:09:36+5:302019-11-16T01:09:41+5:30

ठाण्याची महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार असली, तरी ते मिळविण्यासाठी शिवसेनेतील अनेक नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

Mayor of Thane to be fixed on Thursday | गुरुवारी निश्चित होणार ठाण्याचा महापौर

गुरुवारी निश्चित होणार ठाण्याचा महापौर

Next

ठाणे : राज्यात उदयास येत असलेल्या नव्या राजकीय पॅटर्नमुळे ठाण्याची महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार असली, तरी ते मिळविण्यासाठी शिवसेनेतील अनेक नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, दुसरीकडे उपमहापौरपदासाठी काहींना गळ घालूनही ते यासाठी तयार होत नसल्याचे समोर आले आहे. शोभेचे पद काय कामाचे, असा सवाल या मंडळींकडून केला जात असल्याने महापौरनिवडीपेक्षाही आता उपमहापौरपदाचा तिढा वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शनिवारी, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी महापौर आणि उपमहापौरपदासाठी कोण अर्ज भरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २१ नोव्हेंबरला ठाण्याचा महापौर निश्चित होणार आहे.
राज्यातील बहुतांश महापालिकांच्या महापौरांची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. त्यानंतर, आता ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक २१ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यानुसार, महापौरपदासाठी शिवसेनेतील काही ज्येष्ठ मंडळींमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पक्षश्रेष्ठींनी सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या नावाला पसंती दिली असली, तरी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी महापौरपदाचे आश्वासन मिळाल्यानेच आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले आहे. विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही पुन्हा महापौर होण्याची आशा व्यक्त केली आहे. त्यात आता राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नवीन सत्तासमीकरण तयार होऊ घातल्याने त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडेल, असे चित्र आहे. राष्टÑवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आपसूकपणे मिळणाऱ्या या पदासाठी अनेकांनी दावे केले आहेत.
महापौरपदासाठी एकीकडे चुरस असताना दुसरीकडे उपमहापौरपदासाठी शिवसेनेचा एकही नगरसेवक पुढे येताना दिसत नाही. उपमहापौरपदासाठी निष्ठावान शिवसैनिक म्हणून सुधीर कोकाटे यांच्या नावाला पसंती दिली जात आहे. तर, कळव्यातून उमेश पाटील यांचेही नाव पुढे आले आहे. परंतु, शोभेचे पद कशासाठी, असा सवाल करत दोघांनीही काढता पाय घेतला आहे. उलट, या पदावर महिलेला संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. उपमहापौरपदासाठी अनेकांनी नकारघंटा वाजविल्याने आता महापौरपदापेक्षा उपमहापौरपदासाठी श्रेष्ठी कोणावर जबरदस्ती करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील नव्या राजकीय पॅटर्नमुळे राष्टÑवादी उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे चित्र सध्या आहे. भाजपनेसुद्धा या निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपचे संख्याबळ अवघे २३ असल्याने त्यांनी यातून काढता पाय घेतला आहे. एकूणच आता ही निवडणूक बिनविरोध होणार असली, तरी शिवसेनेतील श्रेष्ठी महापौर पदासाठी कोणावर विश्वास टाकतात, हे पाहणेही महत्त्वाचे आहे.
>..तर भाजपही उतरणार रिंगणात
शिवसेना-काँगे्रस अन् राष्ट्रवादीच्या मनोमिलनाचे दर्शन ठाणे महापालिकेत झाले असले, तरी आता आपले अस्तित्व टिकविण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसकडून महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरले जाणार असल्याचे राष्टÑवादीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. तर, मुंबई महापालिकेत भाजपच्या भूमिकेवर ठाण्यातील भाजपची भूमिका स्पष्ट होणार आहे. मुंबईत अर्ज भरला तर भाजपसुद्धा शनिवारी ठाण्यात दोन्ही पदांसाठी अर्ज भरेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: Mayor of Thane to be fixed on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.