महापौर काका, सांगा आता आम्ही खेळायला जायचे तरी कुठे?
By Admin | Updated: February 13, 2017 05:04 IST2017-02-13T05:04:38+5:302017-02-13T05:04:38+5:30
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मैदानांची सद्यस्थिती पाहता यातील बहुतांश मैदानांची देखभालअभावी दुरवस्था आली आहे.

महापौर काका, सांगा आता आम्ही खेळायला जायचे तरी कुठे?
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मैदानांची सद्यस्थिती पाहता यातील बहुतांश मैदानांची देखभालअभावी दुरवस्था आली आहे. या ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असल्याने मैदाने असूनही खेळाडूंना सरावासाठी ठाणे किंवा मुंबईची वाट धरावी लागते. यातून महापालिकेच्या मैदान विकास आणि क्रीडा धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याठिकाणी सुरक्षाव्यवस्था नसल्याने मैदानांवर गर्दुल्ले, भिकारी यांना आश्रय मिळालाच आहे. त्याचबरोबर येथे असुविधांच्या गर्तेत मैदानी खेळ खेळणे खेळाडूंना जिकरीचे होऊन बसले असले तरी जुगार खेळणाऱ्यांचे मात्र पत्त्यांचे डाव महापालिकेच्या ‘कृपाशिर्वादा’ने रंगत असल्याचे चित्र सर्रास पाहयला मिळत आहे.
कल्याण डोंबिवली शहरात महापालिकेची एकूण १४ मैदाने आहेत. यातील १० कल्याणमध्ये तर उर्वरित ४ मैदाने डोंबिवलीत आहेत. यात प्रामुख्याने कल्याणमधील सुभाष मैदान, वासुदेव बळवंत फडके, यशवंतराव चव्हाण क्रीडांगण(मॅक्सी ग्राऊंड), दादासाहेब गायकवाड क्रीडांगण, नानासाहेब धर्माधिकारी क्रीडासंकुल यासह डोंबिवलीतील सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल, कान्होजी जेधे मैदान (भागशाळा), गावदेवी सोसायटी, नेहरू मैदान यांचा समावेश आहे. कल्याणमधील सुभाष मैदान आणि डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल ही दोन मैदाने मोठी असून याचठिकाणी सर्वाधिक गैरसोयींचा ‘सामना’ खेळाडूंना करावा लागतो. याठिकाणी विकासाच्या नावाने बोंब असल्याने व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. महापालिकेची मालमत्ता असलेल्या या मैदानांना (डोंबिवलीतील क्रीडासंकुल वगळता) साधी सुरक्षा देखील पुरविणे प्रशासनाला जमलेले नाही. त्यामुळे बहुतांश मैदाने ही भिकारी, गर्दुल्ले यांची आश्रयस्थाने झाली आहेत. काही ठिकाणी दारूच्या पाटर्याही झोडल्या जात असून त्यासाठी प्रसंगी क्रिकेटसाठी बनविलेल्या खेळपट्टीचाही वापर केला जातो.
अपुरे मनुष्यबळ असल्याने सुरक्षा पुरवू शकत नसल्याचे तुणतुणे सुरक्षा विभागाकडून नेहमीच वाजविले जाते. दरम्यान, कल्याणमधील वासुदेव बळवंत फडके मैदानावर तर महापालिकेने कचऱ्याच्या गाडया उभ्या केल्याने त्याला डम्पिंगचे स्वरूप आले आहे. अडगळीत पडलेले सामान टाकण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून मैदाने वापरली जात आहेत. एवढेच नव्हे तर कुठल्याही मैदानांवर खेळाडूंना पायाभूत व मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.
या गैरसोयींसंदर्भात विविध क्रीडा संस्थांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही या पत्रांना वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यापलिकडे ठोस अशी कृती झालेली नाही. विशेष म्हणजे एखाद्या खेळाडूने विक्रम केल्यानंतर त्याची दखल मंत्री, आमदार, खासदार आणि महापालिका पदाधिकारी, अधिकारी घेतात. अशा खेळाडूंचा सत्कार करताना मैदाने विकसित करण्याच्या घोषणाही केल्या जातात. मात्र सत्काराचे दिवस विरल्यानंतर यात कोणतीही सुधारणा होत नाही ही वस्तूस्थिती आहे.
कल्याण डोंबिवलीला जशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे तशीच येथे मोठ्या प्रमाणात गुणवंत खेळाडूंचीही काही कमी नाही. अॅथलॉटिक्स, क्रि केट, फुटबॉल, खो-खो, मल्लखांब, कबड्डी, बॅडमिंटन यासारख्या विविध खेळांमधले खेळाडू राज्य, जिल्हा आणि देशपातळीवर चमकले आहेत.असे असतानाही येथे खेळाडूंना प्रोत्साहनपर व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे म्हणून महापालिकेची १५ ते २० वर्षातील धोरणात्मक दृष्टी ही उदासिन असल्याचे स्पष्ट आहे.