आरोग्य अधिकाऱ्यावर महापौर संतप्त, महासभेत निघाले आरोग्य विभागाचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 09:00 AM2021-01-21T09:00:51+5:302021-01-21T09:01:42+5:30

ठाणे : ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांच्या कारभारामुळे बुधवारी सर्वसाधारण सभेत पालिकेच्या आरोग्य विभागाचे अक्षरशः वाभाडे ...

The mayor is angry at the health officer, the general body went to the rent of the health department | आरोग्य अधिकाऱ्यावर महापौर संतप्त, महासभेत निघाले आरोग्य विभागाचे वाभाडे

आरोग्य अधिकाऱ्यावर महापौर संतप्त, महासभेत निघाले आरोग्य विभागाचे वाभाडे

Next

ठाणे: ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांच्या कारभारामुळे बुधवारी सर्वसाधारण सभेत पालिकेच्या आरोग्य विभागाचे अक्षरशः वाभाडे निघाले. आरोग्य केंद्रांची परिस्थिती काय आहे, डॉक्टरांना तीन तीन महिने पगार न मिळणे, आरोग्य कर्मचाऱ्यांशी उद्धट बोलणे अशा स्वरूपाच्या मुरुडकर यांच्या कारभारामुळे महापौरांबरोबरच सभागृहातील सर्व सदस्य संतप्त झाले. मुरुडकर यांच्या कारभारामुळे संपूर्ण आरोग्य विभागाचा कारभार ढिसाळ असून, जर डॉ. मुरुडकर यांना कारभार जमत नसेल तर महापालिकेवर शासनाचे आरोग्य अधिकारी आणा, अशा शब्दात महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले.

आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचा तीन-तीन महिने पगार होत नसल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला. यावर संपूर्ण आरोग्य विभागाच्या कारभाराचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी वाभाडे काढले. तीन महिने पगार न झाल्याने डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुरुडकर यांच्याकडे पाठपुरावा करूनही समस्या सुटलेली नाही. मुरुडकर यांच्याकडून योग्य उत्तरे मिळत नसल्याचे स्वतः महापौरांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ठाण्यातील आरोग्य केंद्रांची परिस्थिती काय आहे, कोणत्या उपाययोजनांची आवश्यकता आहे, याची माहिती डॉ. मुरुडकर यांना देता आली नसल्याने महापौरांनी सांगितले. लस घेणाऱ्यांचेही योग्य नियोजन होत नसल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांपेक्षा शासनाचा अधिकारी आणावा, अशी सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी मांडली.

महापौरच नव्हे तर स्वतः आरोग्य सभापती निशा पाटील यांनीही आरोग्य विभागावर टीका केली. असाच कारभार राहिला तर राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी दिला. यावर अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी डॉ. मुरुडकर यांना १५ दिवसांची मुदत देऊन कारभार सुधारण्याची संधी देण्याची सूचना सभागृहात मांडली.

ड्रायरनसंदर्भात दिली होती चुकीची माहिती
डॉ. मुरुडकर यांनी कोरोना लसीकरण ड्रायरनसंदर्भात प्रसार माध्यमांना चुकीची माहिती देऊन प्रशासनाला अडचणीत आणले होते. त्यावेळी प्रशासनाला खुलासा करावा लागला होता. संपूर्ण आरोग्य यंत्रणाच मुरुडकर यांच्यामुळे कामाला लागली होती. आता स्वतः महापौर यांनीच त्यांच्या कारभारावर टीका केल्याने त्यांचे पदच अडचणीत आले आहे.

पीपीई किट आणि औषधांचा तुटवडा ...
महापालिकेच्या ग्लोबल कोविड रुग्णालयामध्ये पीपीई किट आणि औषधांचा साठा संपला असून, यावरून आरोग्य विभाग आणि रुग्णालय प्रशासनामधील वाद सर्वसाधारण सभेत उघडकीस आला. या रुग्णालयामध्ये उपायुक्त विश्वानाथ केळकर यांच्याकडे जबाबदारी असली तरी, त्यांना वैद्यकीय साहित्यासाठी आरोग्य विभागावर अवलंबून राहावे लागते; मात्र पीपीई किट आणि औषधांचा साठा पुरवठा करण्याची मागणी चार ते पाच दिवसांपूर्वी रुग्णालय प्रशासनाने केली असतानाही आतापर्यंत त्यांना ते उपलब्ध होऊ शकले नसल्याची बाब सभेत समोर आली. 

Web Title: The mayor is angry at the health officer, the general body went to the rent of the health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.