गणित विषयाला सहा महिन्यांपासून शिक्षकच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:25 IST2018-10-20T00:25:22+5:302018-10-20T00:25:30+5:30
- वसंत पानसरे किन्हवली : शहापूर तालुक्यातील टाकीपठार येथे आदिवासी प्रकल्पस्तरीय समितीच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवण्यात येते. पाचशेहून अधिक पटसंख्या ...

गणित विषयाला सहा महिन्यांपासून शिक्षकच नाही
- वसंत पानसरे
किन्हवली : शहापूर तालुक्यातील टाकीपठार येथे आदिवासी प्रकल्पस्तरीय समितीच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवण्यात येते. पाचशेहून अधिक पटसंख्या असलेल्या या आदिवासी आश्रमशाळेत शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवायला शिक्षकच नाहीत.
आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी याकडे कानाडोळा केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सहा महिन्यांत गणित विषय शिकवला नसूनही चाचणी परीक्षेत गणिताचा पेपर घेण्यात आला आणि आता पेपरतपासणीसाठी शिक्षकच नसल्याने निकाल राखून ठेवला आहे. काही दिवसांवर सहामाही परीक्षा जवळ आली असताना आदिवासी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शैक्षणिक टप्प्यात दहावीचे वर्ष महत्त्वाचे मानले जाते. पण, या शाळेत अजून गणित विषय न शिकवल्याने पेपरमध्ये काय लिहायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यामुळे पालकही चिंतेत आहेत. मात्र, आदिवासी विकास प्रकल्प, मुख्याध्यापक तसेच प्रशासनाला याची काही चिंता नसल्याचे चित्र दिसते. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून शाळेचा टक्काही घसरणार असल्याने याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न पालकांना पडला आहे.