घोडबंदर रोडवरील 'द ब्ल्यू रूफ क्लब'मध्ये भीषण आग; रिसेप्शन सोहळ्यातील शेकडो पाहूणे थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:37 IST2025-12-19T10:36:54+5:302025-12-19T10:37:34+5:30
तासाभरात आगीवर नियंत्रण: फटाक्यांमुळे आगीचा दावा

घोडबंदर रोडवरील 'द ब्ल्यू रूफ क्लब'मध्ये भीषण आग; रिसेप्शन सोहळ्यातील शेकडो पाहूणे थोडक्यात बचावले
ठाणे: घोडबंदर रोडवरील ओवळा येथील 'द ब्ल्यू रूफ क्लब'मध्ये लग्न सोहळयानिमित्त आयोेजित स्वागत समारंभा दरम्यान मोठी आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, आग लागताच उपस्थितांनी प्रसंगावधान राखत बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. फटाक्यांच्या थिणगी जुन्या कार्पेटवर पडून ही आग लागल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
ओवळा येथील पानखंडा गावातील बक्षी यांच्या मालकीच्या 'द ब्ल्यू रूफ क्लब' एका लग्नसमारंभानिमित्त स्वागत सोहळा सुरु होता. लॉनमधील स्टोअर केबिन आणि केबिनच्या बाहेर ठेवलेल्या मंडप डेकोरेशनच्या साहित्याला अचानक ही आग लागली. सोहळा सुरु असल्याने त्याठिकाणी सुमारे हजार ते बाराशे पाहूणे मंडळी उपस्थित होते. आगीने अचानक रौद्र स्वरूप धारण केल्याने उपस्थितांमध्ये भीतीने गाळण उडाली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने सर्वजण तातडीने लॉनच्या बाहेर पडले.
घटनेची माहिती मिळताच बाळकुम अग्निशमन केंद्र आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने पथक तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दोन फायर वाहने, एक रेस्क्यू वाहन आणि एका युटीलीटी वाहनासह ही आटोक्यात आणण्याचे जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. माजी नगरसेविका मीनल संख्येही यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात जवांनाना यश आले. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.
स्टोअर रुममधील जुन्या कार्पेटला आग
पार्किंगच्या बाजूला असलेल्या मोकळे जागेत मंडप डेकोरेशन स्टोअरजवळ जुने कार्पेट आणि इतर सामान ठेवलेले होते. त्याठिकाणी फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे बोलले जाते. तर जवळच बटारखानाही सुरु असल्याने नेमकी आग कशामुळे लागली, यामध्ये एकमत झाले नाही. यामध्ये मंडप डेकोरेशन , कार्पेट आदी सामानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.