मार्क्सवादी कम्युनिस्टांनी काँगे्रसवरून मतभेद मिटवावे - के. गंगाधरन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 06:19 IST2018-02-20T06:19:43+5:302018-02-20T06:19:51+5:30
भाजपा सरकारच्या नवउदारीकरणाच्या धोरणाचे रूपांतर भ्रष्टाचारात प्रतिबिंबित होत आहे. राफेल विमानखरेदी घोटाळा, पीएनबी घोटाळा, रोटोमॅक्स पेन आदी घोटाळे उघडकीस येत आहेत

मार्क्सवादी कम्युनिस्टांनी काँगे्रसवरून मतभेद मिटवावे - के. गंगाधरन
ठाणे : भाजपा सरकारच्या नवउदारीकरणाच्या धोरणाचे रूपांतर भ्रष्टाचारात प्रतिबिंबित होत आहे. राफेल विमानखरेदी घोटाळा, पीएनबी घोटाळा, रोटोमॅक्स पेन आदी घोटाळे उघडकीस येत आहेत. नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी ही मंडळी परदेशात जाण्यास भाजपा सरकार जबाबदार असल्याचा आरोप सोमवारी भारताचे क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे अध्यक्ष के. गंगाधरन यांनी केला. यामुळे सद्य:परिस्थितीत डाव्या पक्षांच्या एकजुटीचे महत्त्व खूप वाढले आहे. परंतु, प्रमुख डावा पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात काँग्रेसबरोबर आघाडीत सहभागी होण्याबाबत मतभेद आहेत. त्यामुळे याचा निर्णय लवकरच होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
येत्या २३ ते ३१ मार्चपर्यंत पक्षाच्या वतीने भाजपा सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध व स्थानिक प्रश्नांकरिता जिल्हावार मोर्चे काढण्यात येतील व निदर्शने केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरपीएमच्या केंद्रीय कमिटीची दोन दिवसांची बैठक ठाण्यात पार पडली. पक्षाचे चेअरमन के. गंगाधरन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काही महत्त्वाचे ठराव संमत करून आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. त्याविषयी त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात दारिद्रयनिर्मूलन, महागाई, आरोग्यसेवा आणि शैक्षणिक सुविधांसाठी तरतूद नाही. त्यामुळे त्याविरोधात जनजागृती केली जाईल. केवळ न्यायव्यवस्थाच नाही तर विधानमंडळे, प्रशासन आणि माध्यमे या लोकशाहीच्या चारही स्तंभांवर घाला घातला जात आहे.