२२ लाखांचा हुंडा घेऊनही विवाहितेचा छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 05:15 IST2019-07-20T05:15:34+5:302019-07-20T05:15:41+5:30
वडिलांकडून पैसे आणण्यासाठी शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी अनामिका मिश्रा (२४, रा. कासारवडवली, ठाणे) या विवाहितेने कासारवडवली पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

२२ लाखांचा हुंडा घेऊनही विवाहितेचा छळ
ठाणे : ११ लाखांची रोकड, तसेच ११ लाख १९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने इतका हुंडा तसेच भेटवस्तू देऊनही घर घेण्यासाठी वडिलांकडून पैसे आणण्यासाठी शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी अनामिका मिश्रा (२४, रा. कासारवडवली, ठाणे) या विवाहितेने कासारवडवली पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.
एका खासगी संकेतस्थळावर माहिती मिळाल्यानंतर रोहित मिश्रा (२८) यांच्याशी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी अनामिकाचे लग्न झाले. त्याआधी ११ डिसेंबर २०१८ रोजी रोहितच्या आईवडिलांनी मुलीच्या वडिलांकडून दागिने तसेच महागड्या वस्तूंची मागणी केली. मुलीचे लग्न मोडले जाऊ नये, या भीतीने २१ हजारांच्या रोकडसह शगुनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नवरदेवाच्या नातेवाइकांना कपडेही त्यांनी केले. तसेच २८ जानेवारी २०१९ रोजी घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट, निसर्ग गार्डन लॉन्स, साखरपुडा कार्यक्रमातही त्यांनी पाच लाखांची रोकड आणि एक तोळ्याची सोन्याची अंगठी, दोन तोळ्यांची सोन्याची सोनसाखळी, संपूर्ण संसारोपयोगी वस्तू दिल्या. लग्नाच्या वेळीही लग्नाच्या संपूर्ण खर्चासह नवरदेवाला पाच लाख रुपये, तीन तोळ्यांचे ब्रेसलेट, घड्याळ, मुलीला साडेपाच तोळ्यांचा हार तसेच इतर दागिने आणि काही वस्तू दिल्या.
मात्र, तरीही लग्नानंतर सासरे राजेश मिश्रा, सासू सरला, नणंद मीनाक्षी पांडे आणि पती रोहित यांनी अनामिकाला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. वडिलांनी घर तसेच दागिने दिले नसल्याच्या कारणास्तव सासू, नणंदेने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर, क्षुल्लक कारणावरून सासऱ्यानेही मारहाण केली. १८ जून रोजी पतीनेही मारहाण केली. या प्रकाराला कंटाळून तीने पोलिसांत जात गुन्हा दाखल केला.