Marathi Bana Japatari Om Radhakrishna Society | मराठी बाणा जपणारी ओम राधेकृष्ण सोसायटी
मराठी बाणा जपणारी ओम राधेकृष्ण सोसायटी

मुरलीधर भवार

बदलापूरच्या पश्चिमेतील हेंद्रेपाडा येथे असलेली ओम राधेकृष्ण सोसायटी ही २० वर्षे जुनी आहे. बदलापुरात मराठी टक्का जास्त आहे. त्यातही ओम राधेकृष्ण सोसायटीत १०० टक्के मराठी माणसांचे वास्तव्य आहे. सोसायटीतील सदस्य मराठी बाणा, आपली संस्कृती चांगल्या प्रकारे जपत आहे. हेच या सोसायटीचे वेगळेपण आहे.

सोसायटीमध्ये अनेक सण एकोप्याने साजरे केले जातात. कोणताही सण असला तरी सर्वजण एकत्र येऊ न साजरा करतात. प्रत्येक जण आपापल्या परीने जबाबदारी घेऊ न ती पूर्ण करतो. हेवेदावे याचा मागमूसही तेथे जाणवत नाही. आपल्या घरचेच हे काम आहे आणि ते आपल्यालाच पूर्ण करावे लागणार, या उद्देशाने प्रत्येक जण झटत असतो. सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. विठ्ठल भोळे यांनी सांगितले की, सोसायटीच्या इमारतीच्या बांधकामास १९९८ मध्ये सुरुवात झाली. इमारतीचे बांधकाम १९९९ मध्ये पूर्णत्वास आल्यानंतर रहिवासी येथे राहायला आले. त्यानंतर सोसायटी स्थापन करण्यात आली. सर्वजण गुण्यागोविंदाने येथे राहत आहेत. सोसायटीत १६ सदनिका आणि चार दुकानदारांचे गाळे आहेत. सोसायटीचे डीम्ड कन्व्हेअन्स झालेले आहे. त्यामुळे सोसायटीच्या इमारतीची पुनर्बांधणी करता येऊ शकते. अद्याप इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव कोणाला दिलेला नाही. सोसायटीच्या आवारात सीसीटीव्ही तसेच सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे सोसायटीचे प्रवेशद्वार रात्री ११ ते सकाळी १० वाजेपर्यंत बंद ठेवले जाते. याठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही.
सोसायटीच्या आवारात असलेल्या झाडांमुळे येथील वातावरण आल्हाददायक राहण्यास मदत होते. त्यामुळे दुपारच्या वेळेत अनेक जण या झाडांखाली आसरा घेतात. सोसायटीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॅनल यंत्रणा बसवलेली नाही. २००८ पासून या यंत्रणांची सक्ती करण्यात आली, तर सोसायटी १९९९ पासून अस्तित्वात असल्याने यंत्रणा नसल्याचे डॉ. भोळे यांनी स्पष्ट केले. भविष्यात या दोन्ही यंत्रणा सुरू करण्याचा सोसायटी सदस्यांचा मानस आहे. सोसायटीत धूलिवंदनाचा सण जोरात साजरा केला जातो. त्यात सोसायटीचे सदस्य सहभागी होतात. सोसायटीत गणेश स्थापना केली जात नाही. नवरात्रीत सोसायटीतील सदस्यांसाठी गरबा नृत्याचे आयोजन केले जाते. मात्र, यामध्ये इतर कुणालाही प्रवेश दिला जात नाही.

सोसायटीत भागवत सप्ताहाचेही आयोजन केले जाते. सप्ताहाच्या काळात एक हजारांपेक्षा जास्त लोकांच्या जेवणाची सोय सोसायटी करते. भजन, कीर्तन, भागवत ग्रंथाचे वाचन यामुळे त्या दिवसांतील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालेले असते. यामध्ये महिला मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतात. बदलापुरात भागवत सप्ताहाचे मोठे आयोजन या सोसायटीच्या वतीने केले जाते. यामुळेच शहरात या सोसायटीचा लौकिक आहे. त्यासाठी काही प्रमाणात लोकवर्गणी काढली जाते. या सप्ताहाला व सोसायटीच्या उपक्रमांना माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांचे सहकार्य असते. त्यामुळे सोसायटीचे विविध उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडले जातात.

सोसायटीतील प्रत्येक जण एकमेकांच्या सुखदु:खात नेहमीच सहभागी होतात. सोसायटीत राहत असलेल्या एका भाडेकरूच्या छातीत गुडीपाडव्याच्या दिवशी दुखू लागले. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. तेव्हा, त्यांना सोसायटीच्या सदस्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि त्यांची काळजी घेतली. कठीण प्रसंगात सोसायटीतील प्रत्येक जण एकमेकांच्या मदतीला धावून जातो.


Web Title: Marathi Bana Japatari Om Radhakrishna Society
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.