मनविसेने मुख्याधिकाऱ्यांना दिला शाळांच्या दुरवस्थेचा अल्बम
By पंकज पाटील | Updated: August 2, 2023 17:30 IST2023-08-02T17:29:29+5:302023-08-02T17:30:04+5:30
अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरात १७ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे.

मनविसेने मुख्याधिकाऱ्यांना दिला शाळांच्या दुरवस्थेचा अल्बम
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळांची मोठी दुरवस्था झाली असून याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करत मनसेच्या विद्यार्थी सेनेने आज शाळांच्या दुरवस्थेचे फोटो असलेला अल्बमच अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेट दिला. यावर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शाळांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरात १७ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये जवळपास २२०० विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. या शाळांपैकी काही शाळांची गेल्या काही वर्षात मोठी दुरावस्था झाली असून काही शाळा तर धोकादायक बनल्या आहेत. मात्र तरीही या शाळांकडे अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा आरोप आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी काही दिवसांपूर्वीच या धोकादायक आणि दुरवस्थेत असलेल्या शाळांची पाहणी केली होती. यानंतर आज अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि शाळांच्या दुरवस्थेचे फोटो असलेला अल्बमच त्यांना भेट म्हणून देण्यात आला.
यावेळी शाळांच्या दुरुस्तीसाठी मनविसेने आक्रमक पवित्रा घेतला. हा पवित्रा पाहून मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना या शाळांच्या दुरवस्थेकडे लक्ष देऊन उपायोजना करण्याचे आदेश दिले. तर धोकादायक अवस्थेतील शाळांची पुनर्बांधणी करण्याच्या मागणीलाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्यासह मनसे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर, मनविसे जिल्हा सचिव अंकित कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सृष्टी पवार, शहराध्यक्ष सचिन आंबोकर आणि मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.