लोकवस्तीतील समाज जीवन धाडसाने आणि अभ्यासपूर्ण रीतीने मांडणारा मनोविकास नाट्यजल्लोष म्हणजे अभिव्यक्तीचे पुढचे पाऊल -  रत्नाकर मतकरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 04:15 PM2019-06-03T16:15:04+5:302019-06-03T16:17:35+5:30

लोकवस्तीतील समाज जीवन धाडसाने आणि अभ्यासपूर्ण रीतीने मांडणारा मनोविकास नाट्यजल्लोष म्हणजे अभिव्यक्तीचे पुढचे पाऊल - ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी असे प्रतिपादन केले. 

 Manavikas Natyajlosha means the next step of expression: Ratnakar Matkari | लोकवस्तीतील समाज जीवन धाडसाने आणि अभ्यासपूर्ण रीतीने मांडणारा मनोविकास नाट्यजल्लोष म्हणजे अभिव्यक्तीचे पुढचे पाऊल -  रत्नाकर मतकरी 

लोकवस्तीतील समाज जीवन धाडसाने आणि अभ्यासपूर्ण रीतीने मांडणारा मनोविकास नाट्यजल्लोष म्हणजे अभिव्यक्तीचे पुढचे पाऊल -  रत्नाकर मतकरी 

Next
ठळक मुद्देनाट्य जल्लोषचे ६ वे पर्व नाट्यजल्लोष मधील निवडक सहा नाटिका येत्या रविवारी मान्यवरांसमक्ष रंगायतन मध्ये होणार सादर!मनोविकासाचा संदेश तरलपणे देणाऱ्या बारा नाटिकांचा जल्लोष! 

ठाणे : वंचितांचा रंगमंचावरील नाट्यजल्लोषात लोकवस्तीतील युवकांनी ज्या धिटाईने आणि अभ्यासपूर्ण रीतीने नाटिकांमांधून विषयांची मांडणी केली आहे त्यातून समाज कसा पुढे जातोय हे एकीकडे दिसते आहे तर दुसरीकडे संधी मिळताच हि वंचित मुली-मुले किती सफाईने आणि प्रभावीपणे अभिव्यक्त होत आहेत, हेही दिसून येते, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी वंचित कलाकार कार्यकर्त्यांना शाबासकी दिली. गेले दोन दिवस समता विचार प्रसारक संस्था आणि बालनाट्य आयोजित नाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वाच्या समारोपप्रसंगी ते ठाण्यात बोलत होते. 

     अध्यक्षस्थानी समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साठी जगदीश खैरालिया होते. मतकरी पुढे म्हणाले, वंचितांचा रंगमंच म्हणजे एरवी ज्या मुलांना संधी मिळत नाही त्यांना मुक्तपणे आपले म्हणणे नाट्य माध्यमातून मांडण्याची सोय. आपल्या आजूबाजूचे प्रश्न समजून घेणे आणि त्यांना नेमकेपणाने भिडणे हि गोष्ट इथल्या कलाकारांना आता छान साधायला लागली आहे. यंदा आयपीएचचे डॉ. आनंद नाडकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाने मुलांना अधिक समृद्ध बनवले आहे. हे त्यांनी सादर केलेल्या एकसे एक नाटिका पाहून समजून येते. हा नाट्यजल्लोष सलगपणे न थकता वस्त्या वस्त्या पिंजून काढत समता विचार प्रसारक संस्थेचे कार्यकर्ते जी मेहेनत घेत आहेत त्याचेही मतकरींनी कौतुक केले. ठाण्यातील ज्येष्ठ रंगकर्मी रवी पटवर्धन म्हणाले रंगभूमीवरील हा अभिनव प्रयोग आकर्षक आणि आवश्यक आहे. मनोविकास हि थीम निवडून सादर केलेल्या नाटिका अतिशय मनोवेधक झाल्या आहेत. ठाण्यातील नाट्यलेखक मकरंद जोशी यांनी या मंचाशी  आपण याआधी थेट जोडले गेलो नाही याबाबत खंत व्यक्त करत मुल्लाणी प्रभावीपणे सादर केलेल्या नाटिकांमधून एकाच वेळी अश्रू आणि हसू डोळ्यात उभे राहिल्याचे सांगितले. वंचितांचा रंगमंच हि रंगमंचीय अवकाश अधिक समृद्ध करणारी देणगी आपण रेअंगभूमीला दिली आहेत असेही ते म्हणाले. समता संस्थेच्या डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी प्रास्ताविक करतांना या उपक्रमाचा हेतू केवळ रंगमंचीय सितारे घडविणे हा नसून, वंचित मुलांना अधिक जबाबदार आणि समृद्ध नागरिक व परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ता बनविणे असल्याचे सांगितले. आयपीएच चाय वैदेही भिडे यांनी सांगितले कि, या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे ठाण्यातील प्रसिद्ध लेखक आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मनोविकास या विषयावर वस्तीवस्तीमधील मुलांशी चर्चा करून, होतकरू कलाकारांना मार्गदर्शन करून नाट्ट्यविष्कार प्रभावी होण्यास केलेली मदत. यामुळे यंदाच्या नाटिका अनेक पैलूंनी संपन्न, निरनिराळ्या विषयांचे परीघ विस्तारणाऱ्या ठरल्या. वंचितांचा रंगमंचावरून आरण्यक या व्यावसायिक नाटकापर्यंत झेप घेणारा अभिषेक साळवी बोलतांना भावुक झाला होता. मी जे काही आहे ते या मंचामुळेच असे तो म्हणाला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंद, सुरेंद्र आणि  मंगला दिघे, सुनीती आणि अविनाश मोकाशी, मुक्ता श्रीवास्तव, डॉ. गिरीश साळगावकर, अनुपकुमार प्रजापती, मयुरेश भडसावळे, उद्योजक नरेंद्र आजगावकर, शिवाजी पवार, ऍड. संजय बोरकर, बिरपाल भाल आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन संवेदनशील लेखिका, नृत्यांगना आणि संयोजक हर्षदा बोरकर यांनी केले.

     

मनोविकासाचा संदेश तरलपणे देणाऱ्या बारा नाटिकांचा जल्लोष! 

ठाण्याच्या लोकवस्तीमधील कलाकारांनी मनोविकास या विषयावरील नाटिकांमधून, लहान मुलांपासून ते ६० -७० वर्षापर्यंतच्या कलाकारांनी मानवी समस्यांना उत्कटतेने वाचा फोडली. मनोरमानगर गटाने गेम आणि मन एक मंदिर या दोन नाटिकांमधून  प्राप्त परिस्थितीशी झगडत आनंदी जीवन कसं जगावं याचा कवडसाच उलगडला. भारती पाटणकर, मिथिला गायतोंडे लिखित, दिग्दर्शित नाटिकांमधून मुलांच्या समस्या उलगडतांना मनोविकासाच्या सूत्रांचा कसा प्रभावी वापर होऊ शकतो हे मन आणि बुद्धी यांच्यातील संवादातून व्यक्त करून दाखविण्यात आले. टी.व्ही. मालिका, मोबाईल यामुळे लहानग्यांच्या मनावर होणारे दुष्परिणाम, घरातील संवाद संपणे, पालकांचे दुर्लक्ष यामुळे मुलांच्या मनाचा होणारा कोंडमारा हे सिद्धेश्वर तलाव च्या आम्हाला ही नाटक करायचं आहे या नाटिकेतून मांडण्यात आले. हर्षदा बोरकर लिखित या नाटकातून माणसांच्या होण्याऱ्या चुका यातून सावरत मनावर येणारा ताण नाटकातून खोट-खोट  हसायचं. खोट  रडायचं, थोडं थोडं शिकायचं हे संस्कारक्षम वयावर भाष्य करणारी आणि लहान मुलांचे जीवन उलगडणारी ही नाटके खुप काही व्यक्त करून गेली. माणसांच्या व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमानुसार चेतन दिवे या उदयोन्मुख कलाकार, दिग्दर्शित संशय आणि नॉस्टेलजिया या दोन नाटिकांनी वेगळ्याच दिमाखात, व्यावसायिक रंगभूमीच्या तोडीच्या सादरीकरणाची झलक दाखवली. कॉर्पोरेट जगात स्त्रियांच्या मनाची अवस्था, धावपळ, जबाबदाऱ्या, घरातील लोकांचा, नवऱ्याचा पत्नीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि यावर संवेदनशीलतेने आणि शास्त्रीय पद्धतीने मनोविकासातून मार्ग निघू शकतो हे फार प्रभावीपणे सांगुन गेली. आयपीएचच्या डॉ. शुभांगी दातार आणि डॉ.सतीश नागरगोजे यांच्या मार्गदर्शनामुळे या नाटिका वेगळीच अनुभूती देऊन गेल्या. कसदार अभिनयातून 'फुगे' हि नाटिका विश्वनाथ चांदोरकर या नाट्यजल्लोष मध्ये गेली पाच वर्षे चढत्या क्रमाने व्यक्त होणाऱ्या कलाकाराने सशक्त बनवून दाखवली. किसननगर गटाच्या वतीने वेगळ्या भूमिकेतून कन्डोमबद्दलची तरुण वयात शिरणाऱ्या मुलांची जिज्ञासा आणि यावर शरीरविज्ञान, सामाजिक,सांस्कृतिक, भावनिक जीवन शिक्षण देणारी शिक्षण पद्धती कशी योग्य ठरू शकेल हे पटवून देणारी ठरली. दीपक वाडेकर लिखित माझ्या अस्तित्वाची कहाणी, हि एलजीबीटी कम्म्युनिटीच्या समस्या आणि त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन यावर भाष्य करणारी होती. दोन पुरुषांनी पती - पत्नी सदृश्य एकत्र राहून मुलीचे संगोपन करतांना येणाऱ्या समस्या यावर उत्तम भाष्य या मानपाड्याच्या नाटिकेने केले. 'स्वयंपूर्ण', 'सेल्फी स्व-चा', 'निर्णय', 'लॉस्ट अँण्ड फाऊंड', 'प्रेम म्हणजे काय असतं?' अशा नाटिकांच्या माध्यमातून अनुजा लोहार, आतेश शिंदे, अक्षता दंडवते, दर्शन पडवळ, येनोक कोलियर या लोकवस्त्यांमधील नवोदित लेखक, दिग्दर्शकांनी अनेकविध अनुभव आणि त्यावरील मनोविकासात्मक उपाययोजना याची कसदार मांडणी नाटिकांमधून मांडण्याचा उत्कट प्रयत्न केला. मुलांकडून होणारी मुलींची फसवणूक म्हणजे मुलींच्या आत्महत्येच्या दिशेने जाणे नाही तर स्त्रीने स्वयंपूर्ण बनत शोधलेल्या दिशेकडे वाटचाल आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याच आयुष्यातले मधुर क्षण आपण हरवीत चाललो (लॉस्ट करीत) आहोत. ते कसे पुन्हा मिळवावेत (फाउंड करावेत) याचे भान असणे आवश्यक आहे. मुलांच्या प्रतिभेला आणि स्वप्नांना समाज काय म्हणेल असे म्हणत स्वतःची बंधने घालणारे पालक आणि त्यांना ताळ्यावर आणण्यासाठीची उपाययोजना याची आज फार गरज आहे. या प्रकारचे संदेश तरलपणे देणाऱ्या नाटिका म्हणजे यंदाचा नाट्यजल्लोष!  

नाट्यजल्लोष मधील निवडक सहा नाटिका येत्या रविवारी मान्यवरांसमक्ष रंगायतन मध्ये होणार सादर!

 

             या सर्व कलाकारांच्या मेहेनतीला सुरवातीचे दिग्दर्शन आणि अभिनय  कौशल्य मार्गदर्शन प्रसिद्ध सिने दिग्दर्शक विजू माने यांच्या कडून मिळाले तर  कार्यक्रमाच्या संयोजिका हर्षदा बोरकर यांनी सर्व प्रकारचे सहकार्य सर्व गटांना सतत पुरविले. ठाणे आर्ट गिल्ड (टॅग) मधील रुपाली खैरनार, प्राची दुबे, योगेश खांडेकर, राधिका भालेराव, मिथिला गायतोंडे, सुनंदा केळकर आदी अनेक हौशी कलाकारांनी लोकवस्त्यांमध्ये जाऊन या मुलांना मदत दिली. आयपीएचच्या शुभांगी दातार, डॉ.सुलभा सुब्रह्मण्यम, डॉ. सुनील पांगे, सोनाली मेढेकर, प्रतिमा नाईक आदींनी संहिता बनवितांना ती मनोविकासाच्या संदर्भात नेमकी आणि अचूकपणे येतेय ना याकडे लक्ष पुरविले. संस्थेच्या कार्यकर्त्या लतिका सु. मो., हर्षलता कदम, मनीषा जोशी, मानसी जोशी यांनी वस्त्यात फिरून गट बांधण्याचे काम केले. आयोजनात संजय निवंगुणे, सुनील दिवेकर, अजय भोसले, निलेश दंत, निखिल चव्हाण आदींनी सहाय्य केले. या दोन दिवसात विविध लोकवस्त्यांमधील कलाकार कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या बारा नाटिकांमधून नाट्यजल्लोष चे निरीक्षक आणि आयपीएच चे प्रतिनिधी मिळून पहिल्या फेरीत सहा नाटिका निवडणार असून या निवडक नाटिकांचे सादरीकरण पूज्य साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त रविवारी, ९ जून रोजी सकाळी ९:३० वाजता ठाण्यातल्या राम गणेश गडकरी रंगायतन मध्ये होणार आहे. यावेळी रत्नाकर मतकरी, डॉ. आनंदन नाडकर्णी, ठाण्याच्या महापौर मा. मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, अभिनेता मकरंद अनासपुरे, टॅगचे रंगकर्मी विजू माने, उदय सबनीस, संपदा जोगळेकर, मेघना जाधव तसेच सामाजिक क्षेत्रातील गजानन खातू, युवराज मोहिते, साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार, प्रा. अशोक बागवे, प्रा. प्रवीण दवणे, अरुण म्हात्रे, वासंती वर्तक, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, मिलिंद बल्लाळ, अनिल ठाणेकर  आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. संवेदनशील ठाणेकर आणि आसपासच्या नागरिकांनी या विनामूल्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाच्या शेवटी करण्यात आले.   

 

Web Title:  Manavikas Natyajlosha means the next step of expression: Ratnakar Matkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.