कळवा पुलावर फास लावून घेण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानानं वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 13:08 IST2019-12-03T12:59:56+5:302019-12-03T13:08:56+5:30
क्रेनच्या मदतीने 40 वर्षीय व्यक्तीची सुटका

कळवा पुलावर फास लावून घेण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानानं वाचले प्राण
ठाणे- कळवा इथे एका ४० वर्षीय व्यक्तीने उड्डाण पुलावर स्वत:ला फास लावून घेण्याचा प्रकार घडला. मात्र ठाणे वाहतूक पोलिसांनी आणि स्थानिकांच्या मदतीने प्रसंगावधान दाखवत जवळच असलेल्या क्रेनच्या मदतीने त्या व्यक्तीला सुखरुप खाली उतरवण्यात आले. भगवान कांबळे असं या व्यक्तीचं नाव असून काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
मुलाच्या मृत्यूमुळे झालेला मानसिक आघात आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून भगवान कांबळे यांनी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास भगवान कांबळे कळवा नाका उड्डाण पुलावर गेले आणि त्यांनी सोबत आणलेला दोरखंड उड्डाणपुलावरील रेलिंगला बांधून फास लावून घेण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार खाली उभे असलेले नागरिक पाहत होते. उपस्थितांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर भगवान यांना क्रेन लावून सुखरुप खाली उरवण्यात आले. सध्या त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात भगवान यांच्यावर उपचार सुरु आहेत. भगवान यांनी मद्याच्या धुंदीत असताना हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.