ठाणे: रक्तदाबासाठी वापरण्यात येणाऱ्या तसेच मानवी शरीरास अपायकारक असलेल्या मेफेटर्माईन सल्फेट या इंजेक्शनची शरीर सौष्ठव करणाºया तरुणांना बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या मंगेश परब ( वय ३२, रा. विजयनगर, वर्तकनगर, ठाणे ) या जिम ट्रेनरला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने बुधवारी दिली. त्याच्या ताब्यातून एक लाख ७६ हजारांच्या या औषधांच्या २९० बाटल्यांचा साठाही हस्तगत केला आहे.
वर्तकनगर भागामध्ये मंगेश नावाची व्यक्ती मेफेटर्माईन सल्फेट हे परिशिष्ठ एच या प्रवर्गातील औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती. हे औषध डॉक्टरांच्या परवान्यााशिवाय खरेदी विक्रीस प्रतिबंध आहे. ते मानवी शरिरासाठी अपायकारक असून त्याचा रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी उपयोग केला जातो, याची माहिती असतांनाही तो या औषधाची विक्री करीत असल्याचीही माहिती मिळाली.
त्याच आधारे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भोसले यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांनी संयुक्तपणे २९ जुलै २०२५ रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून मंगेश याला वर्तकनगर ते वैतीवाडी या मार्गावरील विहंग सोसायटीलगतच्या भागात ताब्यात घेतले. त्याच्याकडून औषधांचा बेकायदेशीर साठाही जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता-२०२३ सह कलम १८(क) औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम कायद्याखाली गुन्हाही दाखल केला आहे.