इच्छापत्र केल्याने वारसदारांचे आयुष्य होते आनंदी; मृत्यूनंतरही संपत्तीचे हवे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 06:26 IST2019-11-01T00:39:11+5:302019-11-01T06:26:39+5:30
इच्छापत्र कोणतीही सज्ञान व्यक्ती करू शकतो. नॉमिनेशन केले असले तरी इच्छापत्र केले पाहिजे

इच्छापत्र केल्याने वारसदारांचे आयुष्य होते आनंदी; मृत्यूनंतरही संपत्तीचे हवे नियोजन
डोंबिवली : आपण आपल्या हयातीत संपत्तीचे नियोजन करतो त्याप्रमाणे मृत्यूनंतर आपली संपत्ती कोणत्या वारसदाराला द्यावी, याचे नियोजन केले पाहिजे. त्यामुळे वारसदारामध्ये कलह निर्माण होत नाहीत आणि आपल्या वारसदारांना आनंदी आयुष्य जगता येते. त्यामुळे प्रत्येकाने इच्छापत्र करणे ही काळाची मोठी गरज आहे, असे मत अॅड. शिरीष देशपांडे यांनी व्यक्त केले.
डॉ. रघुवीर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे माधवाश्रम सभागृहात हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त ‘इच्छापत्र का व कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शन व शंकानिरसन करणारा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अॅड. देशपांडे बोलत होते. फेसकॉम कोकण प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्यामसुंदर पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले की, इच्छापत्र कोणतीही सज्ञान व्यक्ती करू शकतो. नॉमिनेशन केले असले तरी इच्छापत्र केले पाहिजे. इच्छापत्र केल्याने वारसांमध्ये कलह निर्माण होत नाहीत. आपल्या मुला-मुलींसोबतच पत्नीला देखील आनंदाने आयुष्य घालविता येऊ शकते. देशपांडे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हा विषय समजून सांगितल्यामुळे नागरिकांना तो अधिक चांगल्या पद्धतीने समजला. इच्छापत्राविषयी सामाजिक, कायदेशीर व अर्थशास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तसेच सेवानिवृत्त मंडळींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश सिनकर व सूत्रसंचालन अमरेन्द्र पटवर्धन यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास टिल्लू, बिनेश नायर यांनी प्रयत्न केले.