‘महिलाराज’ करणार फैसला
By Admin | Updated: June 1, 2016 02:30 IST2016-06-01T02:30:22+5:302016-06-01T02:30:22+5:30
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्यातील अत्यंत

‘महिलाराज’ करणार फैसला
सुरेश लोखंडे, ठाणे
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्यातील अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत ‘महिलाराज’चा फैसला हा अधिक प्रभावी असणार आहे. कारण या निवडणुकीत ५३९ नगरसेविका तर ५२१ नगरसेवक मतदान करणार आहेत.
येत्या ३ जून रोजी १३ मतदान केंद्रांवर मतदान होत असून एकूण १०६० मतदार मतदान करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने पुरुषांच्या तुलनेत अधिक असलेल्या ५३९ महिला मतदार डावखरे, फाटक यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत.
निवडणुकीच्या मतदानकेंद्रात उपविभागीत अधिकाऱ्यांच्या दालनांसह पालघर, शहापूर , वसई, कल्याण, मुरबाड, ठाणे आणि अंबरनाथ येथील तहसीलदारांची दालने मतदान केंद्रासाठी निश्चित केली आहेत. तर भार्इंदर येथील सर्कल कार्यालय आणि बेलापूर येथील विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयाची निवड केली आहे. अशा १३ मतदार केंद्रांमध्ये होणाऱ्या मतदानाची मतमोजणी येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये ६ जून रोजी पार पडणार आहे.
ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातील मतदानामध्ये डहाणू नगरपरिषदेतील २५, जव्हार नगरपरिषदेतील १९ नगरसेवक मतदान करणार आहेत. जि. प. पालघरच्या ६५ सदस्यांसह पालघर नगरपरिषदेचे ३१, शहापूर नगरपंचायतीचे १९, वसई-विरार पालिकेचे १२० नगरसेवक मतदार करणार आहेत. याशिवाय भिवंडी-निजामपूर शहर पालिकेचे ९५, कल्याण-डोंबिवली पालिका १२७, मुरबाड नगरपंचायतीचे १९, उल्हासनगर पालिकेचे ७९, मीरा भार्इंदर पालिकेचे ९८, ठाणे पालिकेचे १३३, नवी मुंबई पालिकेचे ११६, अंबरनाथ नगरपरिषदेचे ६२ आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे ५२ नगरसेवक मतदान करणार आहेत.