महायुतीने आखला ‘फत्ते मुंब्रा कळवा’ प्लॅन; आव्हाडांना खिंडीत घेरण्याचा प्रयत्न
By अजित मांडके | Updated: October 19, 2024 14:27 IST2024-10-19T14:26:27+5:302024-10-19T14:27:13+5:30
आव्हाड गटाचे आठ माजी नगरसेवकांना फोडून मुंब्रा विकास आघाडीही स्थापन करण्यात आली होती. त्यात आता राष्ट्रवादीचे दोन गट पडले.

महायुतीने आखला ‘फत्ते मुंब्रा कळवा’ प्लॅन; आव्हाडांना खिंडीत घेरण्याचा प्रयत्न
ठाणे : मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी मुंब्रा कळव्याचे शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांना खिंडीत गाठण्यासाठी या मतदारसंघात ‘फत्ते मुंब्रा कळवा’ असा प्लॅन आखल्याची माहिती शिंदेसेनेतील सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी दोन प्लॅनही पुढे आले आहेत.
यापूर्वी आव्हाड आणि शिंदेसेनेत असलेल्या दिलजमाईमुळे लोकसभेला आव्हाडांकडून तर विधानसभेला शिंदेसेनेकडून छुपी मदत केली जायची. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दोन गट पडले. आव्हाड आणि शिंदेसेना आमनेसामने आल्याचे चित्र पाहावायस मिळाले. आव्हाड गटाचे आठ माजी नगरसेवकांना फोडून मुंब्रा विकास आघाडीही स्थापन करण्यात आली होती. त्यात आता राष्ट्रवादीचे दोन गट पडले.
प्लॅन पहिला
कळवा मुंब्रा जागा ही शिवसेनेची. उमेदवार शिंदेसेनेचा असणार. राजन किणे हे उमेदवार असू शकतात. त्यांना अजित पवार गट मुंब्य्रात आणि कळव्यात भाजप राजन किणे यांना मदत करणार.
प्लॅन दुसरा
जागा शिवसेनेची उमेदवार अजित पवार गटाचा आणि ताकद तिन्ही पक्षांची. मुस्लिमबहुल मतदारसंघ असल्याने अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांना शिवसेनेच्या तिकिटावर उभे करायचे आणि शिवसेना, भाजप मुल्ला यांना मदत करणार. मुल्ला यांची मुंब्रा कळव्यात एक विशिष्ट ओळख आहे. शिवाय आव्हाड यांचे कट्टर विरोधक म्हणून ते नेहमी चर्चेत असतात. परंतु मुल्ला धनुष्यबाण हाती घेतील का? याबाबत एकमत नाही.