- मुरलीधर भवारकल्याण/मुंबई : भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मिळवलाय, पण यावेळी पक्षांतर्गत दुफळीमुळे उमेदवार पडला, तर सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेईन, अशी तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. आम्हाला ‘वरुण’ नव्हे की, ‘वरून’ही उमेदवार लादायचा नाही. उमेदवार खालूनच आला पाहिजे. पण, तो नक्की विजयी झाला पाहिजे, असे उद्गारही ठाकरे यांनी कल्याणच्या शिष्टमंडळाकडे काढले. त्यामुळे अखेर शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना ‘ए व बी’ फॉर्म देऊन मातोश्रीने माघारी धाडल्याने येथील पेच तूर्त सुटला आहे.बेलापूर मतदारसंघावरील दावा सोडताना शिवसेनेने कल्याण पश्चिम हा भाजपच्या नरेंद्र पवार यांच्याकडील मतदारसंघ खेचून घेतला. २००९ मधील निवडणुकीत माजी महापौर राजेंद्र देवळेकर हे युती असतानाही भाजपच्या बंडखोरीमुळे पराभूत झाले होते, तर २०१४ मध्ये भाजप व शिवसेना समोरासमोर लढले आणि शिवसेनेतील धुसफुशीमुळे विजय साळवी यांचा पाडाव झाला. आपापसांतील हेव्यादाव्यांत एकतर बाहेरचा उमेदवार लादला जाऊ शकतो आणि पर्यायाने तिसऱ्यांदा मतदारसंघात पराभव झाला, तर पुन्हा भाजप त्यावर दावा करू शकतो, हे देवळेकर यांनी ओळखले. त्यांनी सर्व इच्छुकांना एकत्र करून एक पत्र तयार केले व शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांनी पत्र मिळताच बुधवारी दुपारी या सर्व शिवसैनिकांना चर्चेला बोलावले.
Vidhan sabha 2019 : कल्याणचा बालेकिल्ला राखा, अन्यथा राजीनामे द्या, उद्धव ठाकरे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 02:11 IST