Vidhan Sabha 2019: सत्तेत राहण्यासाठी आयलानी-कलानी आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:14 AM2019-09-23T01:14:53+5:302019-09-23T01:15:08+5:30

भाजपची वाढणारी ताकद पाहता कलानी कुटुंब भाजपत येईल आणि उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू आहे. पण, त्याचवेळी कलानी यांचे विरोधक कुमार आयलानी हेही उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहेत.

Maharashtra Vidhan Sabha 2019 With Aylani-Kalani face to face in power | Vidhan Sabha 2019: सत्तेत राहण्यासाठी आयलानी-कलानी आमनेसामने

Vidhan Sabha 2019: सत्तेत राहण्यासाठी आयलानी-कलानी आमनेसामने

Next

- सदानंद नाईक, उल्हासनगर

पप्पू कलानी यांचे उल्हासनगर अशी ओळख आजही कायम आहे. जरी आज पालिकेत भाजप सत्तेत असला तरी. भाजपची वाढणारी ताकद पाहता कलानी कुटुंब भाजपत येईल आणि उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू आहे. पण, त्याचवेळी कलानी यांचे विरोधक कुमार आयलानी हेही उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहेत.

शहरातील राजकारण गेली दोन दशके कलानी व आयलानी कुटुंबांभोवती फिरत आहे. आमदार, महापौर, स्थायी समिती सभापती व पक्षाच्या अध्यक्षपदी महत्त्वाची पदे भूषविलेल्या आयलानी व कलानी कुटुंबांनी शहरहितापेक्षा स्वहिताकडे लक्ष दिल्याने, एकेकाळचे वैभवशाली शहर बकाल झाल्याची टीका होत आहे. विधानसभा निवडणुका येताच पुन्हा आयलानी व कलानी कुटुंबे एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये सत्तेत कायम राहण्यासाठी कसरत सुरू असून भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा लागली आहे.
उल्हासनगर म्हणजे पप्पू कलानी अशी ओळख निर्माण झाली. कलानी १९९० पासून सलग चारवेळा आमदारपदी निवडून आले. त्यापूर्वी त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. तसेच पालिकेत सत्ता बहुतांश वेळा स्वत:कडे ठेवण्यात त्यांना यश आले. चारपैकी दोन वेळा कलानी जेलमध्ये असताना आमदारपदी निवडून आल्याने, त्यांच्या नावाचा डंका देशभर झाला. २००२ मध्ये जेलमधून बाहेर आल्यानंतर पालिका निवडणुकीत ७६ पैकी ४८ नगरसेवक निवडून आणून महापालिकेत सत्ता मिळविली. मात्र महापौरपद अनुसूचित जातीकरिता आरक्षित निघाल्याने, मनाचा मोठेपणा दाखवून महापौरपद रिपाइंच्या मालती करोतिया तर उपमहापौरपद काँगे्रस पक्षाला दिले. दरम्यान, सत्तेसाठी कलानींचे कट्टर समर्थक असलेले साई बलराम, जीवन इदनानी, मोहन गाडो, विनोद ठाकूर, किशोर वनवारी आदी कलानींपासून दूर गेले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने कलानीराजला उतरती कळा लागली.
साई बलराम व जीवन इदनानी यांनी समर्थकांसह प्रथम लोकभारती पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तब्बल १६ नगरसेवक निवडून आणले. तसेच पालिकेतील सत्तेची चावी स्वत:कडे ठेवली. साई पक्षामुळे महापालिकेत शिवसेना-भाजपा व स्थानिक साई पक्षाची १० वर्षे सत्ता होती. तर कलानी कुटुंब सत्तेबाहेर होते. मोदीलाटेत भाजपाचे आमदार कुमार आयलानी यांचा ज्योती कलानी यांनी पराभव करून शहरात कलानी कुटुंबाचा करिष्मा कायम असल्याचे दाखवून दिले. तीन वर्षापूर्वी भाजपने महापालिका निवडणुकीत परंपरागत मित्र शिवसेनेऐवजी ओमी कलानी टीमसोबत आघाडी केली. भाजपने सत्तेसाठी सर्व तत्त्वे बाजूला ठेवून कलानी कुटुंबासोबत आघाडी केल्याची टीकाही त्यावेळी झाली व होत आहे. महापालिका निवडणुकीत भाजप व ओमी टीमचे ३२ नगरसेवक निवडून आले. मात्र सत्तेसाठी नगरसेवकांची संख्या कमी पडताच एका रात्रीत साई पक्षाला भाजपने सोबत घेतले. मात्र पालिका सत्तेची चावी स्वत:कडे ठेवणाºया जीवन इदनानी यांच्या साई पक्षात फूट पाडण्यात भाजपला यश आल्याची चर्चाही शहरात रंगली आहे. पप्पू कलानी यांचा राजकीय प्रवास काका दुलीचंद कलानी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला.
दुलीचंद कलानी यांचा खून झाल्यानंतर कलानी कुटुंबाचा राजकीय वारसा पप्पू कलानी यांच्याकडे आल्यावर ते नगराध्यक्षपदी निवडून आले. दरम्यानच्या काळात राजकीय खूनसत्र सुरू होऊन सर्वाधिक गुन्हे पप्पू यांच्यावर दाखल झाले. अखेर त्यांची रवानगी जेलमध्ये झाली. जेलमध्ये असतानाही दोन वेळा निवडून आले. पहिल्यांदा काँगे्रसचे तर नंतर अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. तर चौथ्यावेळी रिपाइं आठवले गटाच्या तिकिटावर आमदारपदी निवडून येण्याची किमया केली. कलानी जेलमध्ये असताना त्यांचा राजकीय वारसा पत्नी ज्योती कलानी यांनी सांभाळला. त्या सलग सातवेळा स्थायी समिती सभापतीपदी निवडून आल्या. तसेच महापौरपद भूषवून मोदीलाटेतही राष्ट्रवादीच्या चिन्हावर ज्योती कलानी विजयी झाल्या.

तिकीट कुणाला मिळणार
कलानी कुटुंबाचा वारसा ज्योती कलानी यांच्यानंतर मुलगा ओमी कलानी व सून पंचम कलानी यांच्याकडे आला. ओमी कलानी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे.
तसेच भाजपचे शहराध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी हेही मुख्य दावेदार आहेत.
आयलानी यांनीही उपमहापौर, महापौरपद भूषविले असून सलग चार वेळा आमदारपदी निवडून आलेल्या पप्पू कलानी यांना पराभूत करून आमदारपदी निवडून आले होते.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 With Aylani-Kalani face to face in power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.