Maharashtra Election 2019: भिवंडीमध्ये शांततेत पार पडले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 02:47 AM2019-10-22T02:47:18+5:302019-10-22T02:48:28+5:30

Maharashtra Election 2019: भिवंडीतील पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण या तीनही विधानसभा मतदारसंघांत दुपारनंतर मतदार बाहेर पडले. सायंकाळी ६ वा.पर्यंत चार लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Maharashtra Election 2019: Voting was held in Bhiwandi in peace | Maharashtra Election 2019: भिवंडीमध्ये शांततेत पार पडले मतदान

Maharashtra Election 2019: भिवंडीमध्ये शांततेत पार पडले मतदान

Next

भिवंडी : भिवंडीतील पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण या तीनही विधानसभा मतदारसंघांत दुपारनंतर मतदार बाहेर पडले. सायंकाळी ६ वा.पर्यंत चार लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शहर व ग्रामीण भागात किरकोळ वादविवादाच्या घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. काही मतदानकेंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार झाल्याने निवडणूक अधिकारी व पोलीस यंत्रणेने तत्काळ धावपळ करून ती कार्यान्वित केली.

मतदानकाळात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी सायंकाळी ७ वा.पर्यंत मतदान सुरूच होते. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे म्हणून निवडणूक आयोगाकडून वारंवार आवाहन करूनही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसून आले.

भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण या मतदारसंघांत सकाळी ७ वा.पासून संथगतीने मतदानाला सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत प्रथमच ईव्हीएम मशीनसोबत मत-चिन्ह दर्शविणारे यंत्र (व्हीव्हीपॅट मशीन) असल्यामुळे मतदारांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. कालवार, काल्हेर, ठाकूरपाडा, भादवड, हायवे दिवे, कोपर, ईदगाह रोड, ताडाळी या मतदानकेंद्रांवर मतदानयंत्रांत काहीवेळ बिघाड निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाने राखीव मशीनद्वारे मतदान पुन्हा सुरळीत करण्यात आले.

दरम्यान, भिवंडीतील ग्रामीण भागात वीज, रस्ते आदी नागरी सुविधांकडे राजकीय नेते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून फुकटात नेतृत्व मिळविण्याचा प्रयत्न करणाºया स्वयंघोषित नेत्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. याबाबत सोशल मीडियावरही मतदारांची दिशाभूल करणारे मेसेज तीन दिवसांपासून मोबाइलवर फिरत होते. मात्र, याकडे सुज्ञ मतदारांनी पूर्णत: डोळेझाक करीत बहिष्कार लाथाडून आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. त्यामुळे स्वयंघोषित नेत्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात वीजबिलांबाबत नागरिकांमधून ओरड होत आहे. तर, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत, सरकारकडे पाठपुरावा करण्याऐवजी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालून फुकट प्रसिद्धी मिळविण्याचा काही नेतृत्वहीन कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला होता. या आवाहनामुळे ग्रामीण भागात मतदानाबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी उत्स्फूर्तपणे मतदानप्रक्रि येत भाग घेतला. विविध केंद्रांवर मतदारांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
मुस्लिम मोहल्ल्यातही महिला मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मतदारयादीत मयत, बोगस, दुबार नावे आढळली तर अनेक ठिकाणी नावे गायब झाली होती.

मोजक्याच बुथवर मतदारांचा उत्साह

अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील मोजक्याच मतदानकेंद्रांत मतदारांचा उत्साह दिसला. सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह कमी होता. मात्र, सकाळी ११ नंतर मतदार बाहेर पडल्याने मतदानाच्या टक्केवारीला वेग आला. इमारतीमधील मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसत नव्हता. तर, झोपटपट्टी भागातील मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडत होते. सकाळच्या सत्रात मतदानाला सुरुवात होताच बुवापाडा भागात दोन यंत्रेबंद पडल्याच्या तक्रारी आल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

अंबरनाथ पश्चिमेच्या ठरावीक भागातच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. फुलेनगर, जावसई, कोहोजगाव, कमलाकरनगर, वांद्रापाडा, उलनचाळ, फातिमा स्कूल परिसरात मतदारांचा उत्साह होता. अंबरनाथ आयुध निर्माणी वसाहतीतही मतदारांची गर्दी दिसत होती. मात्र, खुंटवली परिसर, भेंडीपाडा परिसर, बुवापाडा भागात दुपारनंतर मतदानकेंद्रांवर गर्दी दिसली. तर, अंबरनाथ पूर्व भागातील सार्ई सेक्शन, कानसई सेक्शन, हाल्याचापाडा, नवरेनगर, मोरिवलीपाडा, हरिओम पार्क, शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर, पालेगाव, अंबरनाथ गाव या भागात मतदारांची संथ पण अपेक्षित साथ मिळाली. सकाळच्या सत्रात या ठिकाणी कमी पण दुपारनंतर या भागात मतदान चांगले झाले.

बुवापाडा भागात दोन यंत्रे बंद पडली होती. मात्र, त्यातील एक यंत्र लागलीच सुरू करण्यात आले. तर, दुसरे यंत्र सुरू होण्यास विलंब झाला. त्यामुळे काही मतदारांनी मतदान न करता माघारी जाणे पसंत केले. या भागात मतदारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांचे पदाधिकारी करत होते.

विनापरवानगी मंडप

अंबरनाथ शहरात मतदानकेंद्रांच्या बाहेर राजकीय पक्षांनी लावलेले मंडप हे परवानगी न घेता लावल्याने त्या मंडपांमध्ये बसण्यास पोलिसांनी हरकत घेतली. तर, काही ठिकाणी कार्यकर्त्यांना हुसकावले.

पावसाची विश्रांती

दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने मतदारांनीही बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. पावसामुळे मतदानावर परिणाम होईल, अशी शक्यता होती. मात्र, तसा प्रकार न घडल्याने टक्केवारी स्थिर ठेवण्यात यश आले आहे.

शहापूरमध्ये दुपारनंतर वाढले मतदान

भातसानगर : शहापूर विधानसभा मतदारसंघात कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. सतत पडत असलेल्या पावसाने सोमवारी उसंत दिल्याने सकाळच्या सत्रात कमी मतदान झाले असले तरी दुपारनंतर मात्र मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडल्याने मतदानाचा टक्का वाढला. शहापूरमधील आदर्श दिव्यांग महिला व पुरु षांचे दोन मतदानकेंद्र व वासिंद येथील सखी मतदान केंद्रावर मुख्य निवडणूक निरीक्षक सी.जे.पटेल, निवडणूक निर्णय अधिकारी जयराज कारभारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निलिमा सूर्यवंशी, अशोक भवारी, नीलिमा मेंगाळ यांनी भेट देऊन या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

बहिष्कार मागे

निवडणुकीवर बहिष्कार घालणाºया दापूर ग्रामस्थांनी मतदान केले. तालुक्यातील दुर्गम भागातील दापूर गावात पिण्याचे पाणी, रस्ता यासारख्या मूलभूत समस्यांमुळे दापूर ग्रामस्थांनी मागील लोकसभा निवडणुकीतही बहिष्कार घातला होता. यावेळीही विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्काराचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाºयांसमवेत दापूर येथे जाऊन ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. ग्रामस्थांच्या समस्यांबाबत संबंधित अधिकाºयांना कार्यवाहीचे निर्देश दिले व ग्रामस्थांना मतदानाचे महत्व समजावून सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी मतदान केले.

शिवसैनिकाचे निधन होऊनही कुटुंबाने बजावला हक्क!

वासिंद : शहापूर तालुक्यातील वासिंद येथील शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र साळुंखे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. मात्र, राजेंद्र यांचे महायुतीच्या विजयाचे स्वप्न साकार करण्याकरिता त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी सोमवारी आवर्जून मतदान केले.साळुंखे कुटुंबातील सदस्य व व्यापारी मधुकर यांचे दीड महिन्यापूर्वी निधन झाले. त्या दु:खातून हे कुटुंब सावरते न् सावरते तोच दोन दिवसांपूर्वी राजेंद्र यांना देवाज्ञा झाली. घरात शोकाकुल वातावरण असतानाही कुटुंबाने मतदान केले. सध्या आम्ही दु:खात असलो, तरी देश व राज्य चालवण्याकरिता सक्षम सरकार निवडून देण्याकरिता मतदान केल्याचे मंगेश साळुंके यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Election 2019: Voting was held in Bhiwandi in peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.