त्यांच्या प्रेमाचे सूर सुरेल झाले अन् संसाराचा मोगरा बहरला, कुलकर्णी दाम्पत्याची लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 06:23 IST2021-02-14T00:27:57+5:302021-02-14T06:23:07+5:30

Valentine Day : एकमेकांचे वैगुण्य स्वीकारण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला त्याचे दोघांनाही कौतुक आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. येत्या १६ एप्रिल रोजी त्यांच्या विवाहाला ४२ वर्षे पूर्ण होत आहेत.

The love story of Kulkarni couple has blossomed. | त्यांच्या प्रेमाचे सूर सुरेल झाले अन् संसाराचा मोगरा बहरला, कुलकर्णी दाम्पत्याची लव्ह स्टोरी

त्यांच्या प्रेमाचे सूर सुरेल झाले अन् संसाराचा मोगरा बहरला, कुलकर्णी दाम्पत्याची लव्ह स्टोरी

- प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : मी तिला म्हणालो, मला भविष्यात पूर्णतः अंधत्व येऊ शकते, तर ती मला म्हणाली, माझ्या शरीरावरचं कोडही वाढू शकतं... चंद्रकांत आणि शोभना यांच्यात झालेला हा इतकाच संवाद, पण त्यातून त्या दोघांना सुखी संसाराचा मंत्र मिळाला. आमच्या सुखी संसाराचा एक टाका तिथेच विणला गेला, असे ते सांगतात. कालांतराने चंद्रकांत यांचे अंधत्व वाढत गेले, पण शोभना यांच्या शरीरावरचे कोड कमी होत गेले. परंतु उभयतांच्या प्रेमाचे जुळलेले सूर अधिक सुरेल झाले अन् संसाराचा मोगरा बहरत गेला. एकमेकांचे वैगुण्य स्वीकारण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला त्याचे दोघांनाही कौतुक आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. येत्या १६ एप्रिल रोजी त्यांच्या विवाहाला ४२ वर्षे पूर्ण होत आहेत.
ही कहाणी आहे ठाण्यातील नौपाडा परिसरात राहणाऱ्या चंद्रकांत कुलकर्णी आणि शोभना कुलकर्णी या दाम्पत्याची. लग्न करतेवेळी शोभना यांच्या शरीरावर कोड होते, तर चंद्रकांत यांची नजर कमी होत त्यांना अर्ध अंधत्व आले होते. दोघांचा समजूतदार स्वभाव त्यांना मॅच्युअर्ड लव्हकडे (परिपक्व प्रेमाकडे) घेऊन गेला आणि दोघांनी एकमेकांचे जोडीदार होण्याचा निर्णय घेतला. चंद्रकांत हे शोभना यांच्यापेक्षा वयाने लहान असल्याने अर्थात शोभना यांच्या घरातून विरोध झाला; परंतु विरोधाला झुगारून ते एकमेकांचे जीवनसाथी झाले.
संमोहन विद्येने आजार बरे करण्यासाठी माजी नगराध्यक्ष वसंतराव मराठे यांच्याकडे चंद्रकांत आणि शोभना हे दोघे भेटले आणि तिथेच त्या दोघांची ओळख झाली. तो काळ १९७७-७८ सालचा होता. हळूहळू ती ओळख मैत्रीत झाली. शोभना यांच्या स्वभावात प्रचंड समजूतदारपणा होता. त्या नेहमी मदतीसाठी तत्पर असत. शरीरावर कोड असल्याने त्यांचे स्थळ समोरच्यांकडून नाकारले जात होते. चंद्रकांत यांनी स्वतः पुढाकार घेत त्यांच्यासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली; परंतु नकारापलीकडे काहीच हाती लागले नाही. आपल्या दोघांमध्ये एकमेकांमध्ये समजून घेण्याची वृत्ती आहे. त्यामुळे आपणच शोभना यांना लग्नाबाबत विचारावे, असे त्यांना वाटले. मात्र, वयाचे अंतर असल्याने त्यांना संकोचही वाटत होता. थोडी हिंमत करून त्यांनी त्रयस्थ व्यक्तीकडून शोभना यांना मागणी घातली. शोभना यांनी नकार दिला तरी शरीरावर कोड असलेल्या समवयस्क मुलीशी लग्न करायचे, असे चंद्रकांत यांनी ठरवले होते. समाजात अंगावरील कोडाबद्दल अनेक गैरसमज आहेत, कोड येणे हा काही भयंकर रोग नाही हेच त्यांना समाजाला सांगायचे होते; परंतु शोभना यांनी पटकन होकार दिला. दोघांनीही आपापल्या घरात निर्णय सांगितला. शोभना यांच्या घरातून वयातील अंतरामुळे विरोध झाला. दोघांनी या विरोधाला झुगारून १६ एप्रिल १९७९ रोजी ते लग्नाच्या बेडीत अडकले. दोघांनाही फिरण्याची आवड असल्याने त्यांनी भारतभर प्रवास केला आहे. अंध मुलीशी विवाह केला असता तर संसारात अनेक अडचणी वाढल्या असत्या. त्यापेक्षा मला शोभनाचे दोष स्वीकारणे जास्त सोपे वाटले. संसारात एक व्यक्ती अशी हवी जी संसार सांभाळण्यास खंबीर असते, असे चंद्रकांत म्हणाले. चंद्रकांत यांनी जोडीदार या विषयावर लिखाण केले आहे. 

- मला आयुष्यात जे हवे होते ते सारं काही मिळाले. सासू-सासऱ्यांनी सून म्हणून नव्हे, तर मुलगी म्हणून माझे लाड केले. या टप्प्यावर मला खूप यशस्वी असल्यासारखे वाटते. आमच्यात कधी वाद झाला नाही. संसारात एकमेकांना समजून आणि सांभाळून घ्यायला लागते, ‘आरे ला कारे’ करून चालत नाही.
    - शोभना कुलकर्णी

Web Title: The love story of Kulkarni couple has blossomed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.