Lockdown Wedding will come soon | आता होणार ‘लॉकडाउन वेडिंग’

आता होणार ‘लॉकडाउन वेडिंग’

स्रेहा पावसकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनानंतर विवाह सोहळ्याच्या कार्यालयात प्रवेश करताना तुमच्यावर अत्तराच्या फवाऱ्याऐवजी सॅनिटायझरची फवारणी होईल. अक्षतांची जागा थर्मल स्क्रीनिंग घेईल. फुले, गजरे यांच्याऐवजी मास्क आणि हॅण्डग्लोव्हज दिले जातील. कारण लग्नाच्या इव्हेंटचे आयोजन करणाऱ्यांनी ‘लॉकडाउन वेडिंग’ ही संकल्पना प्रचलित केली आहे.


लॉकडाउनमुळे रखडलेली लग्ने लॉकडाउन उठल्यानंतर करण्याच्या विचारात असलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकांनी हा नवा अफलातून पर्याय शोधला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मार्चमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला. सामूहिक सोहळे, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे मार्चपासून नियोजित असलेले अनेक लग्नसोहळे रद्द झाले. काहींनी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लग्न उरकलीत.


आता लॉकडाउनचे नियम हळूहळू शिथिल होत असून सामूहिक सोहळ्यांना नियमावलींसह परवानगी मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. विवाह, साखरपुडा असे सोहळे अनेकांनी पुढे ढकलले आहेत. मात्र ‘आता थांबायचा विचार करू नका’ किंवा ‘आपल्या आयुष्यातला सुंदर क्षण साजरा करायला मागे हटू नका’ अशा टॅगलाइन देत कमी माणसांमध्ये कौटुंबिक सोहळा शासनाच्या नियम, अटी पाळत साजरा करण्याचा नवा पर्याय मंगल कार्यालय व्यवस्थापनाने कौटुंबिक समारंभ आयोजित करणाºयांसाठी ठेवला आहे. तसे पॅकेज आणि त्याच्या जाहिरातीही तयार केल्या आहेत. लॉकडाउन सोहळ्यांच्या पॅकेजमध्ये सेफ्टी अ‍ॅरेंजमेंटला अधिक महत्त्व दिले आहे. यात कार्यालयाचे सॅनिटायझिंग, उपस्थितांसाठी मास्क, प्रत्येकाचे थर्मल चेकिंग, सॅनिटायझरची सोय, हात धुण्याची सोय असेल. तसेच सोशल डिस्टन्सिंंगही पाळले जाईल, असे नमूद केले आहे.


समारंभ हा फक्त ५० माणसांमध्ये साजरा करण्याचे बंधन असले तरी सर्व आप्तेष्टांना ई-वेडिंग कार्डस् तसेच डिजिटल अ‍ॅपद्वारे हा सोहळा पाहण्याची आणि त्यात आॅनलाइन सहभागी होण्याची सोयही पॅकेजमध्ये दिलेली आहे. मोठ्या कार्यालयात आणि नटूनथटून विवाह, साखरपुडा करण्याची हौस या नव्या वेडिंग पॅकेजमुळे नक्की पूर्ण होऊ शकते.

शासनाच्या नियम अटी पाळून या पॅकेजप्रमाणे सोहळे होऊ शकतात. इतर काही राज्यात याच नियमांनी सोहळे होत आहेत. आपल्या ठाण्यात जेव्हा शासनाची अशा सोहळ्यांना परवानगी मिळेल. त्यानंतर या पॅकेजप्रमाणे फक्त ५० माणसांमध्ये कार्यक्रम करता येतील.
- रोहित शहा, पार्टनर, टीपटॉप प्लाझा

Web Title: Lockdown Wedding will come soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.