कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST2021-06-01T04:30:37+5:302021-06-01T04:30:37+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेने मंगळवारपासून कोरोनाचे नियम शिथिल करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत; परंतु दुसरीकडे ज्या भागात ...

कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम
ठाणे : ठाणे महापालिकेने मंगळवारपासून कोरोनाचे नियम शिथिल करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत; परंतु दुसरीकडे ज्या भागात आजही कोरोना रुग्ण वाढत आहेत, अशा ८ ठिकाणी लॉकडाऊनचे नियम कडक असतील असे जाहीर केले आहे. याठिकाणी पुढील १५ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यामध्ये लोकमान्यनगर, सावरकरनगर प्रभाग समितीमधील काही भाग, कळवा आणि उथळसर आणि वागळेतील काही भागांचा किंवा इमारतींचा समावेश असून त्याच ठिकाणी कडक निर्बंध राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या इमारती तसेच परिसरांना मायक्रो कंटन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका प्रशासनाने शहरातील १२७ मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले होते. या इमारती तसेच परिसरातील नागरिकांमुळे शहराच्या दुसऱ्या भागांमध्ये संसर्ग होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली जात होती; परंतु आता ती संख्यादेखील खाली आल्याचे दिसत आहे. त्यानुसार शहरात सद्य:स्थितीत अवघे ८ कंटेन्मेंट झोन शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये लोकमान्य, सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये ३ ठिकाणी, कळवा दोन ठिकाणी, उथळसर दोन आणि वागळेतील एका ठिकाणी कंटेन्मेंट झोन असणार आहे. त्यानुसार या भागात येत्या १५ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.