"वाढवण बंदराविरोधातील स्थानिकांच्या लढ्याबद्दल शिवसेना गप्प का?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 23:05 IST2020-11-18T23:05:22+5:302020-11-18T23:05:41+5:30
युवासेनेचे सहसचिव आणि त्यांचे सहकारी स्थानिकांना प्रलोभनं दाखवत असल्याचा आरोप

"वाढवण बंदराविरोधातील स्थानिकांच्या लढ्याबद्दल शिवसेना गप्प का?"
पालघर: वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असेल तर बंदर विरोधातील लढ्यात शिवसेना त्यांच्या सोबतीला असेल असे जाहीर वक्तव्य आणि विश्वास शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी जिल्हावासीयांना दिला असताना त्यांच्याच पक्षाचे पालघरमधील युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव परिक्षीत पाटील व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांनी निर्माण केलेल्या एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्थानिकांना प्रलोभने दाखवत असल्याचा आरोप करत त्यांना विरोध केला.
स्थानिकांशी बेईमानी कराल तर खबरदार! इथे आलात ते दोन पायाने मात्र जाताना चार पायाने जाल, असा सज्जड दम सोशल मिडियावरून दिला जात असून स्थानिकांनी त्यांना गावातून बाहेर जाण्यास बजावले .शिवसेनेच्या काही वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय त्यांचे स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी इतके मोठे पाऊल उचलण्याची हिम्मत करू शकत नसल्याने सेनेच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात असून शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने स्थानिकांच्या संशयाला बळकटी मिळत आहे. ठाण्यातील काही मातब्बर लोकांनी वाढवणच्या आसपासच्या भागातील जमिनी अन्य काही लोकांच्या नावावर खरेदी केल्या असल्याचा सुगावा स्थानिकांना लागला असून या जमिनीचे खरे मालक कोण? याचा शोध घेतला जात आहे.
यावरून तर्कवितर्क लढले जात असले तरी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली जात नसल्याने त्यांच्या सभोवताली संशयाचे जाळे गडद होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.स्थानिका मधून सेनेच्या भूमिके विषयी संशय व्यक्त केला जात असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी स्थानिका मधून केली जात आहे.