बदलापुरात विजेचा 'रात्रीस खेळ चाले'; पिक अवर्समध्ये लोडशेडींग
By पंकज पाटील | Updated: May 15, 2023 16:03 IST2023-05-15T16:01:55+5:302023-05-15T16:03:03+5:30
पिक अवर्स म्हणजे रात्री १०.३० ते १२.३० दरम्यान लोड वाढल्यास लोड शेडींग केले जाणार आहे.

बदलापुरात विजेचा 'रात्रीस खेळ चाले'; पिक अवर्समध्ये लोडशेडींग
बदलापूर: ओव्हरलोडींगमुळे लाईन ट्रिपिंग टाळण्यासाठी लोड शेडींग करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत. रविवारी (ता.१४) यासंदर्भातील ईमेल महापारेषण कंपनीकडून महावितरणला पाठवण्यात आला आहे. त्यानुसार पिक अवर्स म्हणजे रात्री १०.३० ते १२.३० दरम्यान लोड वाढल्यास लोड शेडींग केले जाणार आहे.
सध्या कडक उन्हाळा सुरू असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे विजेचा विशेषतः पंखे, कुलर,एसी आदी उपकरणांचा वापर वाढला आहे. या उपकरणसाठी अधिक वीज लागत असल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात १०० केव्ही क्षमतेच्या अंबरनाथ सबस्टेशनच्या लाईनवरील लोड पीक अवर्स दरम्यान म्हणजेच रात्री १०.३० ते १२.३० दरम्यान ६३० अम्पियर पर्यंत पोहोचतो. अशा परिस्थितीत स्विचिंग फीडर वरून १०० ते १५० अम्पियर लोड रिलीफ करणे आवश्यक आहे.
तसे न केल्यास ओव्हरलोडिंगमुळे लाईन ट्रिपिंगची शक्यता असते. त्यातून पडघ्यावरून येणाऱ्या मेन लाईंनवरही ट्रिपिंग होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास संपूर्ण शहर अंधारात जाऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यास एक ते दीड तासाहून अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे वीज ग्राहकांची मोठी गैरसोय होऊन महापारेषण व महावितरणला आर्थिक फटकाही बसू शकतो. या पार्श्वभूमीवर २२ केव्हीं क्षमतेच्या अंबरनाथ स्विचींग १, अंबरनाथ स्वीचींग २, मोहन सबरबिया स्विचींग व सोनिवली स्वीचींग स्टेशनवरील लाईन्सवर रात्री १०.३० ते १२.३० दरम्यान लोड वाढल्यास लोड शेडींग केले जाणार असल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांनी दिली. एकाच वेळी हे लोड शेडिंग न करता अर्धा अर्धा तास वेगवेगळ्या भागात हे लोडशेडींग केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रात्रीच्या वेळी नागरिकांनी एसी व तत्सम उपकरणांचा वापर कमी केल्यास लोड कमी राहू शकेल,असेही त्यांनी सांगितले.