तुरुंगातील जगणे वैऱ्यावरही येऊ नये

By Admin | Updated: June 12, 2016 01:10 IST2016-06-12T01:10:06+5:302016-06-12T01:10:06+5:30

तुरुंगात नेमके काय चालते, याच्या कथा अनेकदा कानांवर पडतात. त्याबाबत खातरजमा करायला गेले की, त्या कपोलकल्पित असल्याचा दावा अधिकारी करतात. त्यामुळे ‘लोकमत’ने

Living in prison should not be done on the village | तुरुंगातील जगणे वैऱ्यावरही येऊ नये

तुरुंगातील जगणे वैऱ्यावरही येऊ नये

 - सुरेश काटे

तुरुंगात नेमके काय चालते, याच्या कथा अनेकदा कानांवर पडतात. त्याबाबत खातरजमा करायला गेले की, त्या कपोलकल्पित असल्याचा दावा अधिकारी करतात. त्यामुळे ‘लोकमत’ने तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तीची गाठ घेतली आणि त्याच्याकडूनच समजून घेतला, तुरुंगवासाचा सुन्न करणारा अनुभव... घरगुती भांडणात माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी अटक केली. जामीन न मिळाल्याने माझी रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली. २२ दिवस कारागृहात काढले. कारागृहात पहिल्या दिवशीच आफ्टर विभागात नेले जाते. त्या विभागात नेण्यापूर्वी आरोपीला पूर्ण विवस्त्र करुन त्याची संपूर्ण झडती घेतली जाते. त्यावेळी विवस्त्र अवस्थेत पाच उठाबशा काढायला लावल्या जातात. त्याने गुप्तांगात काही वस्तू लपवून ठेवल्या आहेत किंवा कसे ते पडताळले जाते. मी कपडे काढण्यास नकार दिला होता. मात्र तुरुंग पोलिसांनी खाक्या दाखवून मला विवस्त्र होण्यास भाग पाडले. माझी कसून तपासणी झाली. काही आरोपी पहिल्या दिवशी सोबत जेवण घेऊन येतात तर काहींची तशी सोय नसते. मी देखील पहिल्या दिवशी घरचे जेवण नेले होते. मात्र तुरुंगातील सराईत गुन्हेगारांनी माझा डबा हिसकावून घेऊन खाल्ला. तुरुंगातील जेवण अत्यंत निकृष्ट असल्याने पाच दिवस जेवण घशाखाली उतरले नाही. तेव्हा कारागृहातील पोलिसांना वाटले की, मी उपोषण करतो आहे. त्यांनी मला कारवाई करण्याचा दम भरला. त्यामुळे नाईलाजाने कारवाईच्या भीतीने चार घास पोटात ढकलू लागलो. कारागृहातील मुखिया हा आरोपींची यादी तयार करतो. त्याठिकाणी आरोपी कोणत्या गन्ह्याखाली आत आला आहे ते नमूद केले जाते. एखादा मुलीची छेड काढणे, बलात्कार करणे, अशा आरोपांखाली तुरुंगात आला असेल तर कारागृहातील अन्य आरोपींकडून त्याची छळवणूक केली जाते. खून व दरोड्याचा गुन्हा केला असल्यास सराईत गुन्हेगार त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देतात. रात्रभर गोंगाट असतो. मला तर झोपायला एक उशी, सतरंजी दिली गेली होती. तिला कुबट घाणेरडा वास येत होता. पहिल्या दिवशी चादर दिली गेली नाही. सगळेजण दाटीवाटीने एका बरॅकमध्ये कोंबले होते. कैद्यांची गर्दी असल्याने नव्या कैद्यांना शौचालयाजवळ झोपायची सक्ती केली जाते. पहिली रात्र एक क्षणभरही डोळ््याला डोळा लागला नाही. सकाळी शौचास गेलो तर अक्षरश: उलटी आली. शौचालय तुडूंब भरून वाहत होते. गुडघाभर घाण पाण्यात शौचास बसावे लागले. पहिल्या दिवशी मला शौचास झालेच नाही. दुसऱ्या दिवशी गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार आरोपींची विभागणी केली गेली. तुरुंग अधीक्षकासमोर नेण्यापूर्वी कारागृहातील एका आरोपीकडून सगळ््या आरोपींचे दाढी व केस काढले गेले. अधीक्षकांसमोर हजेरी घेतली जाते. त्यावेळी प्रत्येक आरोपींने एका दमात नाव, गाव, पत्ता आणि केलेल्या गुन्ह्याची माहिती द्यायची असा शिरस्ता आहे. जो एका दमात ही माहिती देत नाही त्याच्या हातावर काठीने जोरदार पाच फटके मारले जातात. तसेच त्याच्यामागे उभ्या असलेल्या तुरुंग पोलिसांकडून जोराने धपाटे घातले जातात. एका बरॅकमध्ये १५ पेक्षा जास्त आरोपी कोंबले जातात. प्रत्येक आरोपीला सकाळी पाचला उठावे लागते. तुरुंग पोलीस आरोपी मेला की, जिवंत आहे, याची खात्री करतो. नाश्ता म्हणून उपमा, पोहे दिले गेले. मात्र पोहे इतके राठ होते की चावता येत नव्हते. चहा अत्यंत पांचट होता. डाळीत भरमसाट पाणी असायचे. डाळ अक्षरश: शोधावी लागत होती. भातात खडे, उंदराच्या लेंड्या, माचिसच्या काड्या सापडत होत्या. जेवण चार वाजता यायचे. ते तुम्ही गिळा किंवा न गिळा त्यानंतर काहीही मिळायचे नाही. काही आरोपी या बेचव जेवणाला जुने कपडे जाळून एका थाळीत फोडणी देऊन खाण्याचा प्रयत्न करायचे. फोडणी देण्याकरिता खोबरेल तेल वापरायचे. खोबरेल तेलाला काहीच चव नसते. पण त्यांना फोडणी दिलेले चमचमीत (?) जेवण खाल्ले याचे तेवढेच समाधान वाटायचे. माझ्या आयुष्यातील ते २२ दिवस मला एक भीषण जीवनानुभव देऊन गेले. तुरुंगातील त्या कुबट, बेचव, घाणेरड्या, रोगट, हिंस्त्र, शोषित वातावरणातून बाहेर आल्यावर जेव्हा मोकळा श्वास घेतला तेव्हा खुलेपणानं जगण्याचं स्वातंत्र्य किती मोलाचं आहे, याची जाणीव झाली.

न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर वेळ लवकर जाता जात नाही. वेळ जाण्याची वाट पाहावी लागते. कारागृहातील गबरु आरोपींकडून लहान मोठ्या आरोपींवर होणारे हल्ले, आरोपींच्या मारामाऱ्या हे प्रकार सर्रास सुरु असतात. सकाळी गार पाण्याने कशीबशी अंघोळ उरकावी लागते. काही चांगले आरोपी त्या वातावरणात मानसिक संतुलन घालवून बसतात. त्यांना झोप येत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना झोपेच्या गोळ््या दिल्या जातात. पण अमली पदार्थांच्या आहारी गेलेले आरोपी त्यांच्या झोपेच्या गोळ््या हिसकावून घेतात आणि गोळ््यांचीही नशा करतात. महिला आरोपींची कथा फारशी वेगळी नाही. कारागृहात काही वर्षापूर्वी केळयांचा साठा सापडला होता. त्याचा वापर लैंगिक आनंदासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्याने आता केळी कापून दिली जातात. अनेक आरोपींना वारस नसल्याने ते तुरूंगात अक्षरक्ष: सडत आहेत. काही तरुण आरोपींचे लैंगिक शोषण दांडग्या आरोपीकडून केले जाते. त्याची एक वेगळी बरॅक आहे. तेथे तरुण, नवख्या आरोपींना बळजबरीने नेले जाते. एकाचवेळी तीन-चार दांडगे आरोपी लैंगिक शोषण करतात. पण त्याबद्दल काही बोलायची, तक्रार करायची सोय नाही.

- शब्दांकन : मुरलीधर भवार

 

Web Title: Living in prison should not be done on the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.