साहित्यात तरी भपकेबाजपणा नसावा

By Admin | Updated: November 10, 2016 03:09 IST2016-11-10T03:09:27+5:302016-11-10T03:09:27+5:30

सर्वत्र जाहिरातींचा भपकेबाजपणा असताना निदान साहित्यात तरी तो नसावा, साहित्य संमेलनाची निवडणूक निकोप-पारदर्शी व्हावी, अशी अपेक्षा ९० व्या साहित्य संमेलनाच्या

In the literature there should not be flaky | साहित्यात तरी भपकेबाजपणा नसावा

साहित्यात तरी भपकेबाजपणा नसावा

डोंबिवली : सर्वत्र जाहिरातींचा भपकेबाजपणा असताना निदान साहित्यात तरी तो नसावा, साहित्य संमेलनाची निवडणूक निकोप-पारदर्शी व्हावी, अशी अपेक्षा ९० व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी येथे व्यक्त केली.
‘श्रीकला संस्थे’तर्फे येथील मोरया सभागृहात दवणे यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी त्यांनी उपरोक्त अपेक्षा व्यक्त केली. संस्थापिका दीपाली काळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. ते म्हणाले की, ‘साहित्यात आपापल्या परिने सगळ्यांचेच योगदान आहे. आता मतदारांनी योग्य तो संमेलनाध्यक्ष निवडायला हवा. केवळ टेबलावर पुस्तकांचे ढीग रचत या स्पर्धेत उतरणाऱ्यांना निवडून द्यायचे की, खरोखरच त्याचा मनमुराद आनंद वाचकांना कोण देत आहे, या निकषांनुसार निखळपणे ही निवडणूक व्हावी, एवढेच माझे म्हणणे आहे.’
‘डोंबिवलीशी माझी जुनी नाळ आहे. मी स.वा. जोशी विद्यालयात शिक्षण घेतले. या शहरात मी पु.भा.भावे, शं.ना.नवरे यांना जवळून बघितले आहे. ३३ वर्षांत मला साहित्यातील दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाले’, असे त्यांनी पुढे सांगितले.
‘संमेलनाच्या निमित्ताने साहित्य चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील नवोदितांना संधी मिळायला हवी. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ हवे. ज्यांनी पुस्तके लिहिली आहेत, त्यांच्यासाठी पुस्तक-कवी कट्टा नसावा, तर पुस्तक मार्गदर्शक कट्टा असावा. तसेच ‘संपादक थेट भेटी’ला असा उपक्रम राबवावा,’ असा मानस त्यांनी व्यक्त केला.
मराठी साहित्य संमेलन या अगोदर अखिल भारतीय असा शब्द लागतो, हे कोणीही विसरू नये. पण, आपण मात्र केवळ महाराष्ट्रापुरते ते कार्य मर्यादित ठेवतो. अंतिमत: मराठी भाषा छायाचित्रात बंदिस्त होऊ नये. परदेशात आपलीच मुले, मुली ती टिकवण्यासाठी प्रचंड झटत आहेत. त्यांना त्याविषयी प्रचंड आदर, अभिमान आहे. कोशकक्षेच्या बाहेर बघितल्यानंतरच मराठी भाषेची व्याप्ती समजते. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. संमेलनाध्यक्षपदी निवडून कोणीही यावे, पण साहित्याचा प्रसार, त्याची वाढ आणि तळागाळापर्यंत त्याची आवड, अभिरुची निर्माण करणे आवश्यक आहे,’ असेही ते म्हणाले.

Web Title: In the literature there should not be flaky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.