Likely to be BJP mayor | भाजपचे महापौरपद हुकण्याची शक्यता
भाजपचे महापौरपद हुकण्याची शक्यता

- प्रशांत माने

कल्याण : केडीएमसीच्या २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पाच वर्षांमध्ये एक वर्ष महापौरपद भाजपला देण्याचे ठरले होते. त्यानुसार, पहिली अडीच वर्षे महापौरपद शिवसेनेने भूषविल्यावर त्यानंतर ते एक वर्षासाठी भाजपकडे जाण्याची शक्यता होती. मात्र, उल्हासनगरमधील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर कल्याणचे महापौरपद शिवसेनेने आपल्याकडेच कायम ठेवले आणि ते फॉर्म्युल्यानुसार आणखी दीड वर्षे भूषविले. हा कालावधी या महिन्यात संपत आहे. परंतु, राज्यात उदयास येत असलेले नवे सत्तासमीकरण पाहता सेना सहजासहजी भाजपला महापौरपद देईल का, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

केडीएमसीच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. मात्र, निवडणुकीनंतर युती करून त्यांनी सत्ता स्थापन केली. महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे ५३, भाजपचे ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९ असे आहे. शिवसेनेला अपक्षांचा पाठिंबा असल्याने त्यांचे संख्याबळ ५७ आहे. सत्तास्थापनेनंतर पहिली अडीच वर्षे महापौरपदाचा मान शिवसेनेला मिळाला. उर्वरित अडीच वर्षांमध्ये भाजपला एक वर्ष आणि दीड वर्ष शिवसेनेला असा युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. दरम्यान, मे २०१८ मध्ये पहिल्या अडीच वर्षांचा महापौरपदाचा कालावधी संपुष्टात आल्यावर हे पद वर्षभरासाठी आपल्याला मिळेल, अशी भाजपला अपेक्षा होती. त्यावेळी भाजपने पदाचा दावा केला असता, शिवसेनेने महापौरपद आपल्याकडेच ठेवण्याचा चंग बांधला. यात शिवसेना यशस्वी ठरली. त्यानंतर उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान घडलेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर कल्याणचे महापौरपद दीड वर्षासाठी पुन्हा शिवसेनेला दिल्याचे बोलले जाते. महापौरपदासाठी भाजपचा दावा असताना भाजपच्या कोअर कमिटीने पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महापौरपदाचा दावा सोडला. तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व खासदार कपिल पाटील हे महापौरपदासाठी शिवसेनेच्या तुलनेत आग्रही नव्हते. तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना व भाजपमधील दुवा आहेत. त्यामुळे कल्याणच्या महापौरपदासाठी शिंदे यांना दुखावणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पसंत केले नाही, अशा एक ना अनेक चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेकडून भाजपची उपेक्षा झाली असताना, आताही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभा निवडणूक युतीत लढणारी शिवसेना आणि भाजप राज्यातील सत्तास्थापनेवरून सध्या समोरासमोर उभी ठाकली आहे. एकूणच राज्यातील आणि केंद्रातील बिघडलेले वातावरण पाहता शिवसेना कल्याणचे महापौरपद सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपला महापौरपदापासून दूरच ठेवले जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

...तेव्हा विचार करू : यासंदर्भात शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाजपला एक वर्ष महापौरपद देण्यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही बोलणी झालेली नाही, जेव्हा बोलणी होतील तेव्हा विचार करू, असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

ज्यावेळी केडीएमसीची निवडणूक झाली त्यावेळी झालेल्या युतीमध्ये एक वर्ष महापौरपद भाजपला देण्याचे ठरले होते. त्यानुसार शिवसेनेने ते द्यावे. राज्यातील बदलती परिस्थिती लक्षात घेता व अनिश्चितता पाहता, पुढे काय होईल हे माहिती नाही. ज्या पद्धतीने मित्रपक्ष वागेल त्याप्रमाणे पुढची दिशा ठरेल.
- राहुल दामले, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर, केडीएमसी

Web Title: Likely to be BJP mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.