तरुणाच्या प्रसंगावधानामुळे वाचले महिलेचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 03:05 IST2019-04-04T03:05:10+5:302019-04-04T03:05:29+5:30
मासुंदा तलावामध्ये आत्महत्येचा प्रयत्न

तरुणाच्या प्रसंगावधानामुळे वाचले महिलेचे प्राण
ठाणे : शहरातील मासुंदा तलावामध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अनुराधा रांगणेकर (६०) या महिलेला आकाश शिंदे (२२) या तरुणाने प्रसंगावधान राखून वाचवल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. नौपाडा पोलिसांनी रांगणेकर यांना त्यांच्या केअरटेकर वीणा देशमुख यांच्या ताब्यात दिले आहे.
रांगणेकर यांनी कोणालाही काही समजण्याच्या आतच मासुंदा तलावामध्ये बुधवारी दुपारी उडी घेतली. हा प्रकार पाहून आकाशने क्षणाचाही विलंब न करता तलावात उडी घेऊन तिचे प्राण वाचवले. तेव्हा नौपाडा पोलीस ठाण्याचे बीट क्रमांक-२ चे पोलीस नाईक योगेश संख्ये, भागवत थवील आणि महिला पोलीस शिपाई ज्योती चव्हाण यांनी या महिलेला ताब्यात घेतले. ही महिला तीनपेट्रोलपंप परिसरात ७० वर्षीय केअरटेकर देशमुख यांच्यासमवेत राहते. विचित्र आजाराने ग्रस्त असल्याने मानसिक संतुलन बिघडल्याने तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे समजते.