तलावातील जीवसृष्टी संकटात
By Admin | Updated: September 26, 2015 00:52 IST2015-09-26T00:52:57+5:302015-09-26T00:52:57+5:30
शहराची चौपटी म्हणून ओळख असलेल्या मासुंदासह इतर तलावातील जीवसृष्टी कळत नकळत त्यामध्ये टाकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

तलावातील जीवसृष्टी संकटात
पंकज रोडेकर , ठाणे
शहराची चौपटी म्हणून ओळख असलेल्या मासुंदासह इतर तलावातील जीवसृष्टी कळत नकळत त्यामध्ये टाकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ती वाचवण्यासाठी पर्यावरण संस्थांबरोबर अन्यसामाजिक संस्थांनीही विविध उपाययोजना राबवण्याची गरज असल्याची बाब लोकमतने हाती घेतलेल्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या चळवळीच्या माध्यमातून पुढे आली आहे. तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ, असे ठाणेकरांकडून बोलले जात आहे.
ठाणे रेल्वे स्थानकापासून काही मिनिटांच्या अंतरावर हा तलाव आहे. या ऐतिहासिक तलावाला ‘तलावपाळी’ असेही म्हटले जाते. ठाण्याचे गावदैवत असलेल्या कौपिनेश्वर मंदीर, गडकरी रंगायतन, सेंट जॉन हायस्कूल यासारख्या वास्तू त्याच्या आजूबाजूला आहेत. त्यातच शहराची चौपटी म्हणून त्याची ओळख निर्माण झाल्याने शहरातील नागरिकांसह शाळा-महाविद्यालयातील तरुणाईचा येथे नेहमीच ओढा दिसतो. हा परिसर दिवस-रात्र गजबजलेला असतो. मग यामध्ये सकाळी जॉंगिंगपासून प्रेमीयुगुलापर्यंतची गर्दी होते. विशेषता येणाऱ्यांची पोटपूजा व्हावी म्हणून तलावाला खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी वेढल्याचे दिसते.
चौपटी सुशोभिकरण करण्यासाठी त्यातील गाळ उपसून नैसर्गिक झऱ्याकडे लक्ष देण्यात आले. याचदरम्यान, तेथील प्रदूषण रोखण्यासाठी बाप्पांचे विसर्जन एका ठराविक ठिकाणी केले जाऊ लागले. मात्र, दुसरीकडे येथे कोणतेही परवाने नसलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या गाड्यांवरील शेवटी उरलेले पदार्थ तलावात टाकले जातात. तसेच खाऊन झालेल्या प्लेट ठेवण्यासाठी त्यांच्याकडे योग्य भांडे (डस्टबीन) नसल्याने त्या पदार्थांबरोबर रस्त्यांवरील घोड्यांची विष्टाही पाण्यामार्फत तलावात जाते. तसेच फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांकडून तलावातील माशांना पाव, बिस्टीक टाकण्याची जणू प्रथा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चायनिज तयार करण्यासाठी लागणारे अजिनोमोटो, व्हिनेगर आणि पावातील यीस्टमुळे जीवसृष्टीला जणू आपण विष देत असल्याने ती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हे दृश्य केवळ तलावपाळीच नव्हे तर शहरातील बहुसंख्य तलावांच्या ठिकाणी थोड्याफार फरकाने सारखीच आहे.प्रदूषण रोखण्याबरोबर ही जीवसृष्टी वाचविण्यासाठी पालिका प्रशासनाबरोबर काही सामाजिक व पर्यावरण संस्थांनी पुढाकार घेऊन येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवाने देण्याबरोबर त्यांच्याकडे उरले-सुरले पदार्थांसाठी त्यांना डस्टबीन द्यावेत. तर दिवसभर साचणारे त्यातील पदार्थ घंटागाडी मार्फत उचलून न्यावेत, अशी मागणी आता ठाणेकारांकडून पुढे येऊ लागली आहे.