...हा तर कायद्यावरील हल्ला : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:38 IST2017-08-01T02:38:01+5:302017-08-01T02:38:01+5:30
राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने पत्रकारांवरील हल्ले रोखण्याकरिता कायदा करूनही हल्ले होतच आहेत, हे दुर्दैवी असून हा एक प्रकारे कायद्यावरील हल्ला आहे,

...हा तर कायद्यावरील हल्ला : रामदास आठवले
डोंबिवली : राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने पत्रकारांवरील हल्ले रोखण्याकरिता कायदा करूनही हल्ले होतच आहेत, हे दुर्दैवी असून हा एक प्रकारे कायद्यावरील हल्ला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाºया महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा अकरावा वर्धापन दिन सोहळा रविवारी स.है. जोंधळे विद्यालयात पार पडला. या वेळी आठवले बोलत होते. ते म्हणाले की, पत्रकारांना लेखनस्वातंत्र्य असले पाहिजे व त्यांचे विचार पटले नाही, तर त्याचा प्रतिवाद अन्य वृत्तपत्र किंवा माध्यमातून केला जाऊ शकतो. मात्र, तसे न करता हल्ला करणे चुकीचे आहे. पत्रकारांनीही पुराव्याशिवाय कुणाची बदनामी होणार नाही, याचे भान बाळगणे गरजेचे आहे.
पत्रकारांना संरक्षण, पेन्शन मिळाले पाहिजे. केंद्राची व राज्याची पत्रकारांना पेन्शन देणारी स्कीम असली पाहिजे. मुंबईत काम करणारे बरेच पत्रकार डोंबिवलीत राहतात. त्यांना मुंबईत स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत. पत्रकारांच्या प्रश्नासाठी आपण मुख्यमंत्र्याकडे मागणी करू, असे आश्वासन आठवले यांनी दिले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला चिंता नाही. तसेच मी त्यांच्यासोबत असल्याने त्यांनाही कसली चिंता नाही, असे मिश्कील वक्तव्य करून आठवले म्हणाले की, सध्या काँग्रेसचे दिवस जाऊन भाजपाचे आले आहेत. मोदींवर कितीही टीकाटिप्पणी झाली, तरी ते दुसºया कोणालाही आपल्यासमोर टिकू देत नाहीत.
आठवले यांनी सांगितले की, दलितांवर अनेक ठिकाणी अत्याचार होत आहे, हे खरे असले तरी हळूहळू परिवर्तनही होत आहे. अनेक गावांत आणि शहरात दलित समाज आणि सवर्णीय एकत्र नांदण्याचा प्रयत्न करीत आहे. आंतरजातीय विवाह केल्यास वाद होतो. याबद्दल आवाज उठवणे, ही समाजातील पत्रकारांची जबाबदारी आहे.