ठाणे - ठाण्याचे भुषण असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या १६ कोटी खर्चाच्या दुरुस्तीचा घाट ठाणे महापालिका प्रशासनाने घातला होता. परंतु महासभेत यावर चर्चा होण्यापूर्वीच प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेतल्याचे जाहीर केले. परंतु मागील पाच वर्षात गडकरी रंगायतच्या छोट्या मोठ्या दुरुस्तीच्या नावाखाली पालिकेने कोट्यावधीचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील दक्ष नागरीक संजीव दत्ता यांनी या संदर्भात माहितीचा अधिकार टाकला होता. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. मागील आठवडाभर गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीच्या मुद्यावरुन वादंग पेटला होता. गेल्यावर्षी या नाट्यगृहाच्या छताच्या प्लॅस्टरचा भाग कोसळला होता. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने नाट्यगृहाच्या बांधकामाचे संरचनात्मक परिक्षण केले होते. या परिक्षण अहवालातील सुचनांच्या आधारे प्रशासानाने नाट्यगृह दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, नाट्यगृहाच्या दुरु स्तीवर वारंवार पैसे खर्च होत असल्याचे सांगत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेने नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली होती. दरम्यान नाटयगृहाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पालिकेने पुढे आणला होता. परंतु तो चर्चेला येण्यापूर्वीच हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दरम्यान दत्ता यांनी मागिवलेल्या माहिती अधिकारात पालिकेने गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीवर वारंवार खर्च केल्याचे समोर आले आहे. २००८ मध्ये सुरवातीला विद्यतुच्या काही किरकोळ कामांसाठी ७९ लाख ३७ हजार १८० रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर २०१२-१३ मध्ये ४८ लाख २९ हजार ४००, २०१३-१४ मध्ये १९ लाख ३ हजारांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर स्क्ट्रचरल आॅडीटसाठी २०१५ मध्ये २ लाख ९८ हजारांचा खर्च झाला होता. तर रंगायतनाच्या बाहेरील बाजूस असलेल्या तीन पुतळ्यांची दुरुस्ती करण्यासाठी ६६ लाख ८० हजार, अग्निप्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी १९ लाख ९० हजार, अत्यावश्यक स्थापत्य कामे करण्यासाठी ९ लाख ९० हजार ३०० रुपये, छतामधून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी ९ लाख ११ हजार ४०० रुपये, रंगरंगोटीसाठी ९ लाख ३८ हजार, इतर कामासाठी ९ लाख ९९ हजार ८०० रुपये, छतावर तात्पुरती वेदर शेड टाकण्यासाठी २१ लाख ८० हजार १५५ रुपये, जिप्सम सिलिंग करणे व इतर कामांसाठी २० लाख ६१ हजार ५०० रुपये आणि पॉवर हाऊस चे वॉटर प्रुफींग करणे यासाठी ८ लाख १३ हजार ९०० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा पैशाची उधळपट्टी कशासाठी असा सवाल दत्ता यांनी उपस्थित केला आहे.
मागील पाच वर्षात गडकरी रंगायतनाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 16:51 IST
गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीसाठी मागील पाच वर्षात कोट्यावधींचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्ष नागरीक संजीव दत्ता यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे.
मागील पाच वर्षात गडकरी रंगायतनाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधींचा खर्च
ठळक मुद्देस्ट्रक्चरल आॅडीटसाठी २ लाख ९८ हजारांचा खर्चइतर कामांसाठी सुध्दा ४ कोटीहून अधिकचा खर्च