भाईंदरमध्ये खोदकामादरम्यान जमीन खचली, काँक्रिटचा रस्ता अधांतरी
By धीरज परब | Updated: May 17, 2025 18:11 IST2025-05-17T18:10:34+5:302025-05-17T18:11:35+5:30
Mira Bhayander News: भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक फेज ३ भागात आरएनए विकासकाच्या नावाने सुरु असलेल्या खोल खोदकाम दरम्यान बाजूला लावलेले सेंटरिंग तुटून जमीन खचली.

भाईंदरमध्ये खोदकामादरम्यान जमीन खचली, काँक्रिटचा रस्ता अधांतरी
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक फेज ३ भागात आरएनए विकासकाच्या नावाने सुरु असलेल्या खोल खोदकाम दरम्यान बाजूला लावलेले सेंटरिंग तुटून जमीन खचली. पालिकेचा काँक्रीट रस्ता अधांतरी लटकत असून सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी पालिका आणि विकासक यांच्यातील सुरक्षा बद्दलचा गंभीर हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक फेज ३, तपोवन शाळे जवळ आरएनए ह्या विकासकाच्या नावाने बांधकाम प्रकल्प सुरु आहे. सदर बांधकाम प्रकल्पचे पयलींगचे काम साठी खोलवर जमीन खोदलेली आहे. सदर खोल खोदकाम दरम्यान आजूबाजूचे जमीन ढासळू नये म्हणून बाजूला सेंटरिंग केले गेले आहे.
मात्र शनिवारी पालिकेच्या काँक्रीट रस्त्याच्या जवळचे सदर सेंट्रिंगचे अँगल तुटत असल्याचे तेथील काम करणाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडा ओरडा करून रस्त्यावरील लोकांना बाजूला होण्यास सांगितले. त्याचवेळी मोठा आवाज होऊन सेंट्रिंग सह मोठ्या प्रमाणात जमीन खचून खाली पडली. रस्त्या लगतचे गटार, पाण्याच्या लाईन आदी तुटून पडल्या. काँक्रीटचा रस्ता तर अधांतरी राहिला असून त्याखालची माती - दगड कोसळून खाली पडले आहेत. त्यामुळे सदर रस्ता देखील खचून तुटून पडण्याची भीती आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटना स्थळी धाव घेत परिसर प्रतिबंधित केला. सदर खोदकाम सुमारे ३५ ते ४० फूट इतके असल्याचे सांगितले जाते. सुदैवाने है भागात वर्दळ नव्हती. येथे काम करणारे कामगार देखील रस्त्याच्या कडेला बसत असत.
येथील वीज पुरवठा खंडित झाल्याने रहिवाश्यांचा वीज पुरवठा बंद झाला होता. पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. विकासकाला केवळ बांधकाम परवानगी देऊन नगररचना विभाग नंतरच्या कामा कडे, सुरक्षेचे उपाय - अटीशर्ती कडे दुर्लक्ष करत आले आहे. त्यामुळेच ह्या आधी देखील अश्या घटना घडल्या आहेत. विकासक सह बेजबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली जात आहे.
काही दिवसां पूर्वी भाईंदर पश्चिमेच्या मांदली तलाव येथे नगरभवन इमारत जवळ हलगर्जीपणा करत खोदकाम केले गेले आणि कुंपण सह इमारतीचा आतील मार्ग खचून कोसळला. त्यामुळे पालिकेला कार्यालये रिकामी करावी लागली.