लाल बावटा रिक्षा युनियन काळ्या फिती बांधून करणार सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:37+5:302021-05-27T04:42:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : २०१४ साली भाजपने खोटे बोलून व ईव्हीएम घोटाळा करून केंद्रातील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून ...

लाल बावटा रिक्षा युनियन काळ्या फिती बांधून करणार सरकारचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : २०१४ साली भाजपने खोटे बोलून व ईव्हीएम घोटाळा करून केंद्रातील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून आतापर्यंत या सरकारने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप करीत, याचा निषेध म्हणून लाल बावटा रिक्षा युनियनतर्फे २६ मे रोजी काळा दिवस साजरा करण्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमासकर यांनी बुधवारी केली. ३० मे रोजी शहरात काळ्या फिती बांधून निषेध करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मोदी सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप करीत, त्याचा पाढाच कोमासकर यांनी यावेळी वाचला.
कोरोना पसरवण्याससुद्धा मोदी सरकार जबाबदार आहे. सुरुवातीला पूर्ण देश लॉकडाऊन करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद केले पाहिजे होते. दिल्लीच्या पाच सीमांवर हजारो शेतकरी सहा महिन्यांपासून न्यायासाठी बसले आहेत. त्यांच्याबाबत सरकार अडेलतट्टू भूमिका घेत आहे. ७ वर्षांत शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, दुकानदार, रिक्षावाले, फेरीवाले इत्यादी कष्टकरी नागरिकांसह कोरोनाग्रस्त रुग्णांनाही न्याय देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कोमासकरर यांनी केला. देशभरातील शेकडो कामगार, शेतकरी संघटनांनी २६ मे हा काळा दिवस घोषित करून सरकारचा निषेध करण्याचे ठरवल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाला डोंबिवलीतील संघटनेचे रिक्षाचालक सदस्य काळे झेंडे व काळ्या फिती बांधून निषेध करणार आहेत.